परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत १२९ हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली असून या कामांवर आतापर्यंत २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने विविध शासकीय विभागांतून कामांचे नियोजन केले जाते. कृषी विभागांतर्गत फळबाग लागवडीची कामे या योजनेतून घेतली जातात. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. शिवाय फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यात ५८४ हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांनाही फटका बसला आहे. मध्यंतरी ४ ते ५ महिने ही कामे बंद होती.
सप्टेंबर महिना अखेर रोहयोतून फळबाग लागवड करण्यासाठी १ हजार ६४९ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. १ हजार ५७२ लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात केवळ १५४ लाभार्थ्यांनी फळबागांची लागवड केली आहे. सुमारे १२९ हेक्टर क्षेत्रावर या योजनेतून फळबाग लागवड करण्यात आली असून त्यावर १ कोटी १८ लाख ५७ हजार रुपये अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक उद्दिष्ट लक्षात घेता फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रशासनाला प्राधान्याने कामे हाती घ्यावी लागणार आहेत.
२१ लाखांचा खर्चरोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत २१ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये २ लाख रुपये, मानवत तालुक्यामध्येे १४ लाख, पाथरी ३ लाख ९४ हजार, पूर्णा ९१ हजार आणि सोनपेठ तालुक्यात ७६ हजार रुपयांचा खर्च या योजनेवर झाला आहे.
मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रतिसादरोहयोतून फळबाग लागवड योजनेला मानवत तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या तालुक्यासाठी केवळ ३५ हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात ७८ लाभार्थ्यांनी ७०.७० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. जिंतूर तालुक्यामध्ये १४.९५ हेक्टर, परभणी ३६.३० हेक्टर, पूर्णा ३, सेलू २.९ आणि सोनपेठ तालुक्यात १.८ हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड झाली आहे. गंगाखेड, पालम, पाथरी या तालुक्यात मात्र एकाही लाभार्थ्याने योजनेचा लाभ घेतला नाही.