जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध करताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. यासाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर व टीमचे त्यासाठी सहकार्य लाभले.
कोरोना काळात राबविलेल्या प्रकल्पांच्या आधारे मार्च २०२१ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्कॉच संस्थेस ‘रिस्पॉन्स टू कोविड’ या गटात नामांकन दाखल केले होते. त्यात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या साहाय्याने जिल्ह्यात कोविड-१९ अंतर्गत राबविलेल्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला. मागील वर्षी लॉकडाऊन काळात कापूस खरेदीसाठी शेतकर्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून सुमारे ५० हजार शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले. याच धर्तीवर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली वापरण्यात आली. हॉस्पिटल इन्फॉरमेशन कलेक्शन सिस्टीम (एचआयसीएस) प्रणालीद्वारे कोविड रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत ही माहिती नागरिकांना प्रदर्शित करण्यात आली. ‘पीबीएन शॉप’ या मोबाईल ॲपद्वारे लॉकडाऊन काळात नागरिकांना घरबसल्या किराणा, भाजीपाला उपलब्ध करुन देणे, आदी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला. संस्थेच्या पुरस्कार निवड समितीसमोर २४ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर परभणी जिल्ह्याची उपविजेता म्हणून निवड झाली. अंतिम गुणाकंनानुसार विजेत्यांना ‘रिस्पॉन्स टू कोविड’ या गटात जिल्ह्याला ऑर्डर ऑफ मेरिट प्रमाणपत्र संस्थेने प्रदान केले.