परभणी, दि. 18 : केवळ विद्यार्थ्यांसाठी 'परभणी-पालम' ही बस स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी अचानक जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनीही तात्काळ केवळ विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्याचे आदेश दिले.
परभणी आगारातून सुटणा-या 'परभणी- पालम' या बसमधून इतर प्रवास्यांसोबत धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, सिरसकळस, बलसा, मिरखेल, पिंगळी या 7 गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परभणी शहराकडे दररोज ये-जा करतात़. या विद्यार्थ्यांना महामंडळाकडून विद्यार्थी पासेसही घेतल्या आहेत़. परंतु, या बसमधून कायम क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही़. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी उशिर होतो़. अनेक विद्यार्थ्यांचे यातून शैक्षणिक नुकसान होते.यावर विद्यार्थ्यांनी अनेकदा 'परभणी- पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु, यास यश आले नाही. शेवटी आज या 7 गावच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानी सकाळी ७़.३० ते १० असे जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन केले़.
आंदोलनास आले यशयावेळी विद्यार्थ्याच्या या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. यानंतर त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिका-यांना बोलावून घेतले. या प्रश्नांवर त्यांच्याकडून माहिती घेत जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांसमक्ष 'परभणी-पालम' ही बस केवळ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सोडावी असे आदेश दिले़. यावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सिरसाठ यांनी मंगळवारपासून बस उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. बसची मागणी पूर्ण झाल्याची खात्री होताच यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले़. या आंदोलनात ऋषीकेश सुकनूर, मोनिका देशमुख, सचिन डहाळे, केदार पाठक, ऋषीकेश वाघमारे, सोहेल शेख, तान्हाजी घोडके, अशोक अंभोरे आदींसह ६० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
प्रशासनाची उडाली धांदलविद्यार्थ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी अचानक ठिय्या आंदोलन केले़. त्यामुळे पोलीस कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाली़.पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला़ परंतु, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़.