सेलू : आरोग्य व शहरातील पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान जनजागृती’करिता रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी शुक्रवारी दिली.
निरोगी आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवून जनजागृती करण्यासाठी २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता लोकमान्य टिकळ पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ होईल. हुतात्मा स्मारक येथे समारोप होणार आहे. सायकल रॅलीत सेलू, जिंतूर आणि परभणी येथील सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच महिला, विद्यार्थी, शहरातील अधिकारी, डाॅक्टर, व्यापारी, वकील व सायकलप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. सायकलिंगचे शरीरासाठी होणारे फायदे यासंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पर्यावरणपूरक संदेश देणारे फलक रॅली मार्गावर लावण्यात येणार असून, रांगोळी, पुष्पवृष्टीसह जागोजागी सॅनिटायझर तसेच मास्क वाटप करण्यात येणार आहे. रॅलीत खा. संजय जाधव,आ. मेघना बोर्डीकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांचाही सहभाग असेल. सायकलप्रेमींनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांनी केले आहे.