परभणी : दरवर्षी वेगवेगळ्या साथींचा प्रतिबंध आरोग्य विभागाला करावा लागतो. मात्र, दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग असल्याने साथीच्या इतर आजारांतही घट झाली आहे. पावसाळ्यात फैलावणाऱ्या डेंग्यूचा केवळ एक रुग्ण जिल्ह्यात नोंद झाला आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, विषमज्वर, डेंग्यू या आजारांच्या साथी बळावतात. दरवर्षी डेंग्यूच्या साथीचे प्रमाणही अधिक असते. मात्र, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे इतर साथ आजार मात्र वाढले नसल्याचे दिसते. जून महिन्यात जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापीची साथ पसरली होती. मात्र, त्यात डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली नाही. येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार या कार्यालयाने आतापर्यंत ३८६ जणांचे नमुने तपासले असून, त्यात केवळ एकाचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरला होता. या वर्षातही ६२७ रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात आठजणांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, कोरोना संसर्ग नसलेल्या २०१९ या वर्षात जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. २०१९ मध्ये ९६८ रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४९ जणांचे डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे कोरोना संसर्गापूर्वी पसरणारे इतर साथ आजार या दोन वर्षांत मात्र घटल्याचेच दिसत आहे.
शहरात आढळले होते १० संशयित
जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी मागील जून महिन्यात शहरात मात्र डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली होती. जून महिन्यात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण तापीच्या आजारावर उपचार घेत होते. खासगी प्रयोगशाळांमध्ये या रुग्णांचे डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र, शासकीय रुग्णालयात केलेल्या एलायझा तपासणीत एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आढळला नाही. मागील महिन्यात शहरात १० डेंग्यू संशयित रुग्णांची नोंद मनपा प्रशासनाने घेतली. त्यामुळे या रुग्णांच्या परिसरातील २०० रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात एकाचाही अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह नसल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
वर्षनिहाय तपासलेले नमुने
२०१७ : ३८८ : १
२०१८ : ६४४ : ३०
२०१९: ९६८ : ४९
२०२०: ६२७ : ०८
२०२१: ३८६ : ०१
काय घ्यावी काळजी
ॲडीस या डासामुळे डेंग्यू होतो. तेव्हा डास उत्पत्ती स्थळे नष्ट करावीत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. झोपताना मच्छरदानीचा वापर करावा. घरासमोरील नाल्यांतील पाणी वाहते करावे. घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा.