पालम : तालुक्यातील गळाटी व लेंडी नदीच्या पुरामुळे २३ सप्टेंबर रोजी तब्बल १४ गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे.
तीन दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरूच असल्याने पालम तालुक्यातील बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे. लेंडी नदीच्या पुरामुळे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नऊ गावांचा संपर्क तुटला होता. २४ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा एकदा पूर आल्याने ही गावे संपर्क बाहेर आहेत. प्रामुख्याने पुयनी येथील पुलावरून लेंडी नदीचे पाणी वाहू लागल्याने सकाळी १० वाजल्यापासून पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी, तेलजापूर आणि गणेशवाडी या गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे. दुसरीकडे याच नदीवरील पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड गावचा संपर्कदेखील तुटलेला आहे. गळाटी नदीवरील सायळा ते सीरपूर दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामूळे ११.४५ वाजल्यापासून सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडीचा संपर्क पालमशी होऊ शकत नाही.
ऑटोरिक्षा फसला
पालम तालुक्यातील खुर्लेवाडी येथून दूध घेऊन केरवडीला येणारा ॲटोरिक्षा सिरपूर ते सायाळा दरम्यानच्या रोडवर सकाळी ७ वाजता फासला होता. अखेर वाहनातील दुधाच्या कॅन बाहेर काढून चौघांना ॲटो ढकलून चिखलाबाहेर काढावा लागला. पाऊस आल्यानंतर हा प्रश्न हमखास उद्भवतो, अशी माहिती ऑटोचालक भगवान गायकवाड यांनी दिली.
लसीकरण रद्द
तालुक्यात सध्या लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गुरुवारी ही पाऊस होत असल्याने गुलखंड येथील लसीकरण मोहीम रद्द करण्यात आली.