परभणी येथील उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, अवजड आदी प्रकारच्या ३ लाख ५४ हजार ८९ वाहनांची संख्या आहे. प्रत्येक वाहनाचा विमा काढणे व त्या वाहनाची प्रदुषण चाचणी करून तशा प्रकारचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घेणे प्रत्येक वाहनधारकास बंधनकारक आहे. असे असताना व यासाठी कमी शुल्क असतानाही जवळपास ९० टक्के वाहनधारक वाहनाची प्रदुषण चाचणी करून घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली. वाहनधारकांचा हा निष्काळजीपणा नियमबाह्य असून तो दंड पात्र आहे, असेही नखाते यांनी सांगितले.
२१० वाहनधारकांकडून ६५ हजारांचा दंड वसूल
जिल्ह्यात प्रदूषण चाचणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने उप प्रदेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत १ हजार ७६६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१० वाहनधारकांकडे सदरील प्रमाणपत्र आढळले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
तपासणी मोहिम राबविणार
प्रत्येक वाहनधारकाने आपल्या वाहनाची प्रदुषण चाचणी करून घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने लवकरच जिल्ह्यात परिवहन विभागाच्या वतीने तपासणी मोहिम राबिवण्यात येणार आहे. प्रमाणपत्र नसलेल्यांना दंड आकारण्यात येईल.
- श्रीकृष्ण नखाते,
आरटीओ, परभणी