- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी ) : शेतकऱ्याने शेतालगत सोडलेली बैलगाडी त्यास बांधलेल्या बैलांनी जवळच्या कालव्याकडे ओढत नेल्याने बैलगाडी कालव्यात कोसळली. यात एक बैल मृत्युमुखी पडला असून एकास बैलास वाचविण्यात यश आले आहे. ही घटना जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्या लगत पोहेटाकळी शिवारात आज दुपारी 12 च्या सुमारास घडली.
पोहेटाकळी येथील शेतकरी विठ्ठल अंशीराम गोगे हे शेतातील विद्युत मोटारीचे स्टार्टर बिघडल्याने सकाळी 11 वाजता गावातून बैलगाडी घेऊन शेताकडे आले होते. शेतजवळील डाव्या कालव्याच्या काही अंतरावर त्यांनी बैलगाडी सोडली व कासऱ्याने दोन्ही बैल त्यास बांधून ते शेताकडे गेले. यानंतर अचानक गाडीला बांधलेल्या बैलांनी गाडी ओढत ओढत कालव्याच्या बाजूला आणली. कालव्याजवळ गाडी येताच ती घसरत घसरत कालव्यात कोसळली. यासोबत त्यास बांधलेले दोन्ही बैलसुद्धा त्यात कोसळले. कालव्यात पाणी भरपुर असल्याने बैल बुडायला लागले.
ही बाब कालव्याजवळ असलेल्या राधाकिशन बागल व अर्जुन उजगरे यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता त्या कालव्यात उडी घेतली. तसेच मदतीसाठी इतरांना आवाज दिले. त्यांचे आवाज ऐकून परिसरातील शेतकरी जमा झाले. यानंतर अथक परिश्रमाने बैलगाडी आणि एक बैल बाहेर काढण्यात यश आले. मात्र, यात एक बैल पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडला.