ताडबोरगाव : ओढ्याला आलेला पूर बैलगाडीने ओलांडत असताना बैलजोडी पाण्यात वाहून गेली तर बैलगाडीतील तिघांनी पुराच्या पाण्याबाहेर येत स्वतःचा जीव वाचविला आहे. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.
येथील शेतकरी राधाकिशन मल्हारी येडे यांची शेती सेलू रोडवर असून, त्यासाठी ओढ्यातून रस्ता आहे. २२ सप्टेंबर रोजी मानवत रोड येथे पाऊस नव्हता. त्यामुळे त्यांचा सालगडी उमेश पवार, दैवशाला पवार व अन्य एक महिला मिरची तोडण्यासाठी बैलगाडीतून शेताकडे जात होते. ओढा ओलांडत असताना करंजी, झोडगाव आदी भागांत जोरदार पाऊस झाल्यामुळे अचानक ओढ्याला पाणी वाढले. त्यात बैलगाडी वाहून गेली. उमेश पवार व अन्य दोन महिला पोहून वर आल्याने सुदैवाने बचावल्या. मात्र यात बैलजोडी वाहून गेली. पुढे काही मीटर अंतरावर हे बैल मृतावस्थेत सापडले. यात शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.