मानवत : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पहिल्या टप्प्यातील अनुदान आणि पीएम किसान योजनेतील २ हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यावर वर्ग झाला असून, हे अनुदान उचलण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे.
येथील तहसील कार्यालयाला राज्य शासनाकडून १० कोटी ८३ लाखांची मदत प्राप्त झाली. नुकसान भरपाईचे हे अनुदान दोन टप्प्यात वाटप केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात सर्व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मदत मिळणार आहे. तालुक्यातील एकूण २१ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, ३२ हजार ८१९ शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने १० कोटी ८३ लाख ८१ हजार ४९१ रुपये अनुदान तहसील कार्यालयाकडे वर्ग केले होते. तहसीलने शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून बँकेकडे वर्ग केल्या असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली असल्याने पैसे काढण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत.
फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा
दुष्काळी अनुदानासह पी. एम. किसान योजनेचे २ हजार रुपयेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. हे २ हजार रुपये उचलण्यासाठी जिल्हा बँकेच्या दारात शेतकरी गर्दी करीत आहेत. या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सचा पुरता बोजवारा उडला आहे. या गर्दीवरून अनुदान उचलण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहिली नसल्याचे दिसत आहे. शहरातील कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आदी बँकांच्या परिसरात बुधवारी गर्दी दिसून आली.
वार ठरवून देण्याची गरज
दुष्काळी अनुदानासह पीएम किसान योजनेतील अनुदान त्याचबरोबर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी शेतकरी व नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहेत. बँक प्रशासनाने अनुदान उलचण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक दिवस ठरवून द्यावा, जेणेकरून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
फोटो - शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अतिवृष्टीचे आलेले अनुदान आणि पी. एम. किसान योजनेची रक्कम उचलण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.