परभणी : पालम आणि मानवत तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या पालम तालुक्यात दोन तर मानवत तालुक्यात १० उपचाराधीन रुग्ण आहेत. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या घटल्याने, नागरिकांना आता काळजी घेऊन तिसरी लाट रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडले. अनेक रुग्णांना या लाटेत मृत्यूही पत्करावे लागले. आता ही लाट ओसरली असून, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ग्रामीण भागात सध्या १४५ रुग्ण असून, पालम तालुक्यात २ तर मानवत तालुक्यात केवळ १० रुग्णांची नोंद झाली आहे. या दोन्ही तालुक्यांबरोबर इतर तालुक्यामधील ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर आहे. कोरोनाचा संसर्ग आता लक्षणीयरित्या घटला असून, पुन्हा पुढे हा संसर्ग वाढू नये, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १४५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ३० तर सेलू तालुक्यात २४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. परभणी तालुक्यात २१, पूर्णा १२, पाथरी १२, सेलू २४, गंगाखेड २१ आणि सोनपेठ तालुक्यात १३ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामीण भागातही सर्व व्यवहार खुले असून, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. या नियमांचे पालन केले नाही, तर रुग्ण संख्या आणखी वाढण्यास वेळ लागणार नाही.
दहा दिवसांमध्ये घटली रुग्णसंख्या
मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ५ जून रोजी २१, ६ रोजी १६, ७ रोजी ११, ८ जून २०, ९ जून रोजी ५, १४ जून रोजी ११ रुग्णांची ग्रामीण भागांमध्ये नोंद झाली. सध्या १४५ रुग्ण या भागात उपचार घेत आहेत.
दहा दिवसांतील बाधित रुग्ण
५ जून : २१ ६ जून : १६ ७ जून : ११ ८ जून : २० ९ जून : ०५ १० जून : ०९ ११ जून : १३ १२ जून : २१ १३ जून : १८ १४ जून : ११
गर्दी टाळण्याचे आवाहन
जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या घटल्याने, सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातही बाजारपेठ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमधून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये, याची काळजी घेण्याची गरज आता ग्रामस्थांवर आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.