लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पालम शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये दुसºया मजल्यावर पंचायत समितीचे कार्यालय आहे. ग्रामीण भागातील विकासासंदर्भात दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य आदींसह जबाबदार लोकप्रतिनिधींची नेहमीच या कार्यालयात उठ-बस असते. पंचायत समितीला कार्यालयाला पाणीपुरवठा करणारी विंधन विहीर मागील अनेक दिवसांपासून कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या इमारतीवर टाक्यांमध्ये पाणीच शिल्लक नाही. टँकरने पाणी घेणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या परिसरात पाण्याचा ठणठणाट निर्माण झालेला आहे.विशेष म्हणजे, पिण्यासाठी तर सोडाच सांडपाणीही उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधींसह महत्त्वाच्या कार्यालयात पाण्याअभावी शौचालय बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयालाही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे दिसत आहे.तालुकाभरात उपाययोजना; पं.स.त मात्र हतबलता४यावर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी कोरडीठाक पडली असून गावतलवातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.४टंचाईग्रस्त गावातील ग्रामपंचातीच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. पाणींटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीतील अधिकाºयांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयावर पंंचायत समिती कार्यालयात बसूनच नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पंचायत समितीच्या कार्यालयातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असताना या कार्यालयातील पाण्याचा प्रश्न अधिकारी सोडवू शकले नाहीत, असेच म्हणावे लागेल. सध्या तरी येथील अधिकारी , कर्मचाºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
परभणी जिल्ह्यात पालम पं.स. मध्ये पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:20 AM