परभणी : पालम तालुक्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कापूस पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुसरे पीक घेण्याची तयारी केली जात आहे. जवळपास १०० हेक्टरवरील कापूस शेतक-यांनी उपटून टाकला आहे.
पालम तालुक्यामध्ये यावर्षी ८५० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकेही चांगली निघाली. पुन्हा तब्बल दोन महिने पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पिकांची वाढही खुंटली होती. परतीच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. तसेच पाते व बोंडांनी झाडे लगडली. यावर्षी उत्पादन चांगले निघेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. कापसाची पहिली वेचणीही सुरू झाली. परंतु, अचानक बोंड अळीने पिके उद्ध्वस्त होत आहेत. बहुतांश क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अगोदरच २५ टक्के बोंडे परतीच्या पावसात गळून पडली. आता औषधी, फवारणी करूनही बोंड अळी नियंत्रणात येत नाही.
कृषी विभागाच्या वतीने बोंड अळीग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी शेतक-यांकडून अर्ज मागविले होते. परंतु, अनेक शेतक-यांकडे बियाणे खरेदीची पावती नसल्याने अर्ज सादर करता आले नाहीत. यामुळे यापासून वंचित रहावे लागले. यामुळे शेतकरी कापूस पीक उपटून दुसरे पीक घेण्याचा विचार करीत आहेत. अनेक शेतक-यांनी तर कापूस उपटण्यास सुुरुवात केली आहे. एकट्या आरखेड शिवारात जवळपास १०० हेक्टरवरील कापूस शेतक-यांनी उपटून टाकला आहे. सकाळपासून शेतकरी या कामामध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. यामुळे या क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.