पालम तहसील कार्यालयात ९ टेबलवर सकाळी ९ च्या सुमारास पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यात आली. सुरुवातीस प्रत्येक वॉर्डातील पोस्टल मतमोजणी करण्यात आली. आरखेड ग्रामपंचायतीचा निकाल सर्वप्रथम लागला. या ठिकाणी सत्ताधारी गट असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे
राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर व राष्ट्रवादी यांच्या पॅनलने ९ पैकी ९ जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे २ वाॅर्डांत विरोधकांना तीन अंकी आकडाही गाठता आला नाही.
फळा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख हनुमंत पौळ व विद्यमान सरपंच अर्जुन ढवळे यांच्या महाविकास आघाडीने ९ पैकी ९ जागांवर विजय मिळविला. सायळा ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बळीराम चवरे यांच्या गटाने ९ पैकी ५ जागा पटकावत सत्ता कायम ठेवली आहे. जवळा येथे दत्तराव मामा पौळ यांच्या पॅनलने ७ पैकी ५ जागा मिळवून सत्ता कायम केली आहे. चाटोरीत पंचायत समिती उपसभापती अण्णासाहेब किरडे, माजी जिप उपाध्यक्ष गोपीनाथ तुडमे व काँग्रेसचे कांतराव चव्हाण यांच्या गटाने १३ पैकी १२ जागांवर विजय पटकावत सर्वात मोठी ग्रामपंचायत ताब्यात घेतली. खोरस येथे मदन सुरनर यांच्या गटाने ९ पैकी ९ जागांवर ताबा घेतला आहे. बोरगाव (खु) येथे राष्ट्रवादीच्या ७ पैकी ७ महिलांनी बाजी मारली आहे. चोरवड येथे राष्ट्रवादीचे बाळासाहेब देशमुख यांच्या गटाने ९ पैकी ९ जागा मिळवत एकहाती सत्ता ठेवली आहे. पुयणी येथे सत्ता परिवर्तन झाले असून भाजपाचे माधवराव गिनगिने यांच्या गटाने ९ पैकी ६ जागांवर विजय मिळविला. नाव्हा येथे सुदाम पवार व विश्वंभर बाबर यांनी ९ पैकी ६ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळवली आहे.