सेलूतील अपघात विभाग सुसज्ज
देवगावफाटा: सर्वसामान्यांना आरोग्य सेवेच्या बाबतीत दिलासादायक ठरणारे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आता जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या ५० लाखांचा निधीतून ७ खोल्यांचा सुसज्ज अपघात विभाग तयार होत आहे. हा विभाग वैद्यकीय सुविधा भर घालणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात सेलू शहर व तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या ९३ गावातील रुग्णसेवेचा भार आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्याचा होणार कायापालट
बोरी: जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या निधीमधून १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच या इमारतीच्या बांधकामास ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट होणार आहे. विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी गावाकडे पाहिले जाते. या गावाची लोकसंख्या जवळपास ३० हजाराच्या घरात आहे.
हिरकणी कक्ष गायब
देवगावफाटा: कर्मचारी महिला आणि प्रवासी महिलांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्यासाठी सुरु केलेल्या हिरकणी कक्ष बसस्थानकावरून गायब असून एसटी महामंडळाने सुरू केलेल्या हिरकणी कक्ष या योजनेला घरघर लागली आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला आणि स्थानकावर येणाऱ्या प्रवासी महिलांना त्यांच्या बाळांना योग्य प्रमाणात स्तनपान करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्षाची स्थापना केली. मात्र सेलू येथील बसस्थानक हे या योजनेसाठी अपवाद आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशला खो
परभणी: मनरेगा अंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावीत,अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र याकडे अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशाला अधिकाऱ्यांनीच खो दिल्याचे दिसून येत आहे.