पालम तालुक्यातील ५ ठिकाणी ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रांना वीज पुरवठा करण्यासाठी पालम ते गंगाखेड २५ किलोमीटर सिंमेट पोल व तारा या ४० वर्षांपूर्वी वीज कंपनीने टाकल्या आहेत. या तारा व साहित्य नव्याने टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे विजेची वाढती मागणी व जुनाट तारा यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होत आहेत. वादळी वारे येताच सिमेंटचे खांब अर्ध्यातून तुटत आहेत. तसेच विजेचा अतिरिक्त भार येताच तारा वितळून जागेवरच तुकडे होत आहेत. याचा परिणाम वीज पुरवठावर होत आहे. नेहमीच बिघाड होत असल्याने पालमकराना अंधारात राहावे लागत आहे.
दुरुस्ती पथकाची दमछाक
पालम तालुक्याला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य लाइनमध्ये कधी बिघाड होईल याचा नेम राहिलेला नाही. वीज पुरवठा बंद पडताच ग्राहक ओरड करीत आहेत. तर बिघाड कोठे झाला, याची तपासणी करून दुरुस्ती करताना अधिकारी व कर्मचारी पथकाची दमछाक होत आहे. या पथकाला रोजच दुरुस्ती करावी लागत आहे. २५ किलोमीटर मुख्य लाइन जागोजागी खराब झाली आहे. नेहमी तारा वितळून तुटल्याने वीज गुल होत आहे. याचा उद्योग व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे पूर्ण वीज लाइन लोखंडी खांब टाकून नवीन तारा देणे गरजेचे आहे.