लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे कृषी विभागाने सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस अळीने बाधित असल्याने आणखी दीड लाख हेक्टरवरील पंचनामे शिल्लक आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने २ लाख ९ हजार ४८ हेक्टर क्षेत्र कापसासाठी प्रस्तावित केले होते़ प्रत्यक्षात शेतकºयांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापसाची १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टरवर लागवड केली़ प्रस्तावित क्षेत्रांपैकी ९१ टक्के कापसाची लागवड झाली़ विशेष म्हणजे, यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली होती़ गतवर्षी सोयाबीन पिकाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही़ त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान चांगले होणार असल्याच्या अंदाजावरुन शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली़ अपेक्षेप्रमाणे शेतकºयांचे कापूस पीक बहरले़दिवाळीपासून जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात झाली़ मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पहिली वेचणी झाल्यानंतर कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक बोंडअळीने हिरावून नेले़ कापूस उत्पादक अडचणीत सापडला़ बोंडअळी नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच गेली़ परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनू लागली़ बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात सर्वच तालुक्यातून कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या़ वाढत्या तक्रारी लक्षात घेता, कृषी विभागानेही या संकटाचे गांभीर्य ओळखले़ तक्रारींचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर सुरुवातीला शेतकºयांकडून रितसर तक्रार अर्ज भरून घेण्यात आले. आता तर थेट पंचनामेच करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाले आहे.कृषी विभागाने पंचनामे सुरू केले असून, २१ डिसेंबरपर्यंत १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रापैकी ३५ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत़ परभणी तालुक्यात ६ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे तालुका कृषी कार्यालयाकडून तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी आदींनी पूर्ण केले आहे़ गंगाखेड १ हजार ४५०, पाथरी २ हजार २०५, जिंतूर १ हजार ४१०, पूर्णा ६ हजार ५४७, पालम १ हजार ५३२, सेलू १२ हजार ५६, सोनपेठ ७८५ आणि मानवत तालुक्यात २ हजार ७४२ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़शेतकºयांच्या नजरा मदतीकडे४कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे़ दरवर्षी पिकांवर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ यावर्षी पीक चांगले येऊनही त्यातून उत्पन्न हाती लागले नाही़ कापूस उत्पादकांनी यावर्षी लागवड केलेल्या पावणेदोन लाख हेक्टरवरील कापूस पीक बाधित झाले आहे़ बाधित शेतकरी सध्या शासनाकडून मिळणाºया मदतीची प्रतीक्षा करीत आहे़ शासनाने दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ३० हजार रुपये व बागायतीसाठी प्रती हेक्टरी ३७ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे़ मात्र या मदतीचे निकष अजून स्पष्ट झालेले नाहीत़ त्यामुळे शेतकºयांच्या नजरा सध्या शासकीय मदतीकडे आहेत़सरसकट मदत द्याजिल्ह्यातील कापूस लागवडीचे सर्व क्षेत्र बोंंडअळीने बाधित झाले असल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे़ त्यामुळे कापूस उत्पादक हतबल झाला आहे़ शासनाने कापूस उत्पादक शेतकºयांना मदत देताना कोणतेही निकष न ठेवता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी कापूस उत्पादकांतून होत आहे़९२ हजार ८२४ कापूस उत्पादकांना फटकाजिल्ह्यामध्ये ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत़ यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांनी यावर्षीच्या खरीपात कापसाची लागवड केली़ मात्र कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला अर्धा खर्च उत्पादनातून निघालेला नाही़ त्यामुळे या शेतकºयांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी कृषी विभागाच्या बाधीत झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत़ आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ८२४ शेतकºयांपैकी केवळ ३९ हजार २२३ शेतकºयांचेच पंचनामे पूर्ण झाले आहेत़ त्यामुळे जवळपास ५० हजार शेतकºयांचे पंचनामे येत्या काळात कृषी विभागाला पूर्ण करावयाचे आहेत़
परभणी जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील कापसाचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:12 AM