लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भाग पाणीटंचाईने होरपळत असताना दुसरीकडे मात्र शहरात पाण्याचा व्यवसाय तेजीत आला आहे़ या व्यवसायाला सुगीचे दिवस आले असून, व्यवसायातील उलाढाल दुप्पटीने वाढली आहे़ परभणी शहरात दिवसाकाठी सरासरी साडेतीन लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायात होत असल्याची माहिती समोर आली आहे़पाणी टंचाई जिल्ह्यासाठी पाचवीला पुजलेली आहे़ दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते आणि जिल्हावासियांची पाण्यासाठीची धावपळ ठरलेली असते़ यावर्षी देखील जिल्हावासियांची यातून मुक्तता नाही़ ग्रामीण भागात पाणीसाठे आटले आहेत़ प्रमुख प्रकल्प आणि गाव तलावांनी तळ गाठल्याने भूजल पातळीही खोल गेली आहे़ परिणामी गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ शहरी भागातही अशीच परिस्थिती आहे़ परभणी शहरात ३० वर्षांच्या जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ सध्या १२ दिवसांतून एक वेळा नळाला पाणी येत आहे़ त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती परभणी शहरातही निर्माण झाली आहे़दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याला मागणी वाढते़ यावर्षी देखील पाणीटंचाई वाढली तशी विकतच्या पाण्याला मागणी वाढली आहे़ शहरामध्ये अनेकांनी पाण्याचे शुद्धीकरण करून पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे़ घरोघरी जारचे पाणी पोहचून हा व्यवसाय केला जातो़उन्हाळा वगळता या व्यवसायात बऱ्यापैकी उलाढाल होत आहे़ मागील दोन महिन्यांपासून तर पाण्याच्या व्यवसायाला चांगलीच उभारी मिळाली आहे़ सरासरी दुप्पटीने हा व्यवसाय वाढला आहे़ त्यामुळे परभणी शहरातील एकूण व्यवसायिकांची संख्या लक्षात घेता दिवसाकाठी सर्वसाधारणपणे साडेतीन लाख रुपयांची उलाढाल पाण्याच्या व्यवसायातून होऊ लागली आहे़ मे महिन्यात टंचाईची स्थिती अधिकच गंभीर होते़ या काळात या उलाढालीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत़अडीच लाख लिटर : पाण्याची विक्रीपरभणी शहरामध्ये पाण्याचे प्रकल्प वाढले आहेत़ सुमारे ५० ते ६० छोटे मोठे प्रकल्प असून, छोट्यात छोट्या व्यावसायिकाकडून २० लिटर क्षमतेचे दररोज किमान २०० जार विक्री होत आहेत़ यातून सर्वसाधारणे अंदाज बांधला तर दिवसाकाठी १२ हजार जारचे शुद्ध पाणी शहरामध्ये पुरविले जात आहे़ थंड पाण्याचा एक जार ३० रुपयांना तर थंड न करता एक जार २० रुपयांना विक्री होतो़ यातून सुमारे २ लाख ४० हजार लिटर पाण्याची रोजची विक्री होत आहे़ त्यामुळे या व्यवसायातून सर्वसाधारणपणे साडेतीन लाख रुपयांची उलाढाल होते़ पाणी विके्रत्यांनी शहरात घरोघरी पाण्याचे जार पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे़ उन्हाळ्यापूर्वी असलेल्या ग्राहकांची संख्या दुप्पटीने वाढली आहे़ तसेच जे ग्राहक उन्हाळ्यापूर्वी दोन-तीन दिवसाआड एक जार पाणी वापरत होते तेच आता दररोज एक जार असे पाणी वापरत आहेत़ त्यामुळे शुद्ध पाण्याची मागणी वाढली आहे़ शिवाय शहरातील हॉटेल्स आणि व्यावसायिकांनीही ग्राहकांसाठी जारचे पाणी उपलब्ध करून दिल्याने या ग्राहकांची भर पडली आहे़पाच रुपयांत पाणीपाण्याच्या विक्रीमध्ये आता किरकोळ व्यावसायिकांनीही उडी घेतली आहे़ परभणी शहरात हॉटेल्स, पानपट्टयांवर पाण्याचे जार ठेवून पाच रुपयांना एक लिटर पाणी विक्री केले जात आहे़ विशेष म्हणजे, शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक भागातही हा व्यवसाय तेजीत आहे़ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जार उपलब्ध केले असून, पाणी विक्री वाढली आहे़ ३० रुपयांच्या जार मधून सुमारे ९० रुपयांची कमाई किरकोळ विक्रेते करीत आहेत़ त्यामुळे हा व्यवसाय सध्या तेजीत आहे़
परभणी शहरातपाणीविक्रीतून दररोज साडेतीन लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:29 AM