राजन मंगरुळकर
परभणी : नागरिकांच्या मूलभूत समस्या समजून घेत त्यांची तत्काळ सोडवणूक व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी शहरात विविध भागांची पायी फिरून पाहणी केली. तब्बल तीन ते साडेतीन तासाच्या या पायी पाहणी दौऱ्यात त्यांनी खड्डेमय रस्ते, रस्त्यावर वाढलेली धुळ, जलवाहिनीची कामे, स्त्री रुग्णालय इमारत बांधकामाची स्थिती यासह जागोजागी होणारी वाहतूक कोंडी व विविध प्रश्नांवर मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. या पाहणीमुळे परभणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शहरातील महापालिका क्षेत्रातील रस्ते, बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते तसेच विविध प्रश्नांवर काही दिवसांपासून नागरिकांची ओरड होत होती. यासह वेळोवेळी नागरिकांनी आंदोलने करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शहरातील विविध मार्गांची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या पाहणी दौऱ्याची सुरुवात केली. जिंतूर रोडवरील स्त्री रुग्णालयाची प्रस्तावित इमारत, दर्गा रोड, दर्गा परिसर, जुना पेडगाव रस्त्याची पाहणी करुन त्यानंतर महाराणा प्रताप चौक, शनिवार बाजार तेथून हडको, कल्याण मंडपम, जायकवाडी परिसर, देशमुख हॉटेल, उघडा महादेव मंदिर या सर्व ठिकाणांची पाहणी त्यांनी केली. यावेळी आयुक्त देविदास पवार, शहर अभियंता वसीम पठाण, उपअभियंता पवन देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी मांडल्या समस्याशहरातील विविध ठिकाणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पायी फिरून रस्त्यांची पाहणी केली. त्यावेळी नागरिकही आवाक होऊन या पाहणी दौऱ्याकडे पाहत होते. काही जणांनी जिल्हाधिकारी गोयल यांच्याशी संवाद साधून धूळ आणि रस्त्याचे प्रश्न मांडले. या समस्या पाहण्यासाठीच आल्याचेही जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या.
रोड मॅपनुसार केली पाहणीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे रस्ते, प्रलंबित बांधकामे, महापालिका क्षेत्रातील हस्तांतरित केलेले रस्ते यासह जलवाहिनीची कामे आणि स्त्री रुग्णालय व वाहतुकीचा प्रश्न याचा रोड मॅप आणि रूट मॅप तयार करून ही पाहणी करण्यात आली.
रस्ते व विविध प्रश्नांवर नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. ही बाब समजल्यावर सर्व ठिकाणची पाहणी करून संबंधित यंत्रणांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच उपाययोजना केल्या जातील. पावसाळा असल्याने तात्पुरत्या स्वरूपात दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कामे संबंधित विभाग पूर्ण करतील. - आंचल गोयल, जिल्हाधिकारी.