परभणी: शहरातील पथदिवे बसविण्याचे काम आता राज्य शासनाच्या एजन्सीमार्फत होणार असून ७ वर्षांपर्यंत ही एजन्सी देखभाल दुरुस्तीही करणार असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील शहरांमध्ये पथदिवे बसविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. शहरातील सर्व रस्त्यांवर या योजनेअंतर्गत एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. जानेवारी महिन्यात शासनाने हा निर्णय घेतला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नगरविकास विभागाचे सचिव जाधव, मुंबई येथील कंपनीचे प्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून परभणी शहरात राज्य शासनाच्या एजन्सीमार्फत एलईडी पथदिवे बसविण्याच्या कराराला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात परभणी शहरात या एजन्सीमार्फत पथदिवे बसविण्याचे काम सुरू केले जाईल, अशी शक्यता आहे.
सध्या परभणी जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे पथदिवे बसविण्याच्या प्रत्यक्ष कामाला आचारसंहिता संपल्यानंतरच सुरुवात होणार आहे. परभणी शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम यापूर्वी महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत केले जात होते. शहरात ठिकठिकाणी पथदिवे बसविणे, नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती करणे, साहित्य खरेदी ही कामे मनपामार्फतच केली जात होती. परंतु, आता राज्य शासनाने एका कंपनीला कंत्राट दिल्याने ही कंपनी पथदिव्यांचे काम करणार आहे. परिणामी मनपाला यातून आर्थिक लाभ होणार आहे.
शहरात ११ हजार पथदिवे परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांसह वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांवर मिळून ११ हजार १४३ पथदिवे आहेत. या पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती महापालिका करते. मुख्य रस्त्यांबरोबरच वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे बंद पडले अथवा नवीन पथदिवे टाकण्यासाठी मनपाच्या विद्युत विभागाशी संपर्क करावा लागत असे. शहरात सध्या ९५ टक्के पथदिवे सुरु आहेत. नवीन एजन्सीने काम सुरु केल्यानंतर जुने पथदिवे बदलून एलईडी पथदिवे टाकले जातील.
खर्चात होईल बचतशहरातील पथदिव्यांसाठी महापालिकेला कामगारांसाठी वर्षाला ५० लाख रुपये, साहित्य खरेदीसाठी ५० लाख रुपये आणि पथदिव्यांच्या वीज बिलापोटी सुमारे ३ कोटी रुपये खर्च होतो. पथदिव्यांचे काम एजन्सीने सुरु केल्यानंतर कामगार व साहित्यावरील खर्चाची बचत होणार आहे. शिवाय एलईडी पथदिवे बसविल्याने वीज बिलातही घट होणार असल्याचे मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख तन्वीर बेग यांनी सांगितले.ईईएसएल कंपनीला कामपरभणी शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम ईईएसएल या कंपनीला मिळाले आहे. राज्यस्तरावरुन कंपनीची निवड झाली असून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी प्रत्यक्ष काम सुरु करणार आहे.
एनर्जी आॅडिटच्या सूचनाशहरातील पथदिव्यांचे विद्युत आॅडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त पी. शिव शंकर यांनी दिल्या आहेत. शहरामध्ये एकूण पथदिव्यांची संख्या, त्यावर वर्षाकाठी होणारा खर्च, वीज बिलाचा खर्च आदी बाबींचा अंतर्भाव करुन एनर्जी आॅडिट केले जाणार आहे. हे आॅडिट झाल्यानंतर करार झालेल्या कंपनीला वर्षाकाठी होणारा खर्च आणि मनपाने द्यावयाची ठराविक रक्कम याविषयीचा लेखाजोखा तयार केला जाणार असल्याची माहिती मिळाली.