परभणी : सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची त्वरित मदत व्हावी यासाठी डायल ११२ हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. याद्वारे अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी आवश्यक असलेली मदत पोलिसांमार्फत पोहोचविली जाते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा डायल ११२ क्रमांक कार्यान्वित झाला आहे. ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्हा पोलीस दलाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित मदत पोहोचविण्यात राज्यातून दुसरा क्रमांक मिळविला आहे.
परभणी जिल्हा पोलीस दलातील नियंत्रण कक्ष व डायल ११२ या क्रमांकाची यंत्रणा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित आहे. शहरासह जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी नागरिकांना एखाद्या प्रसंगात पोलिसांची मदत हवी असल्यास या क्रमांकावर संबंधितांनी संपर्क साधल्यानंतर ती त्यांना अवघ्या दहा मिनिटात दिली जाते. यात रस्ते अपघात, भांडणे, मारामारी, किरकोळ कारणातून घरगुती स्वरूपात होणारे वाद तसेच सर्व प्रकारच्या किरकोळ आणि गंभीर गुन्ह्यांच्या प्रकारात मदत घेण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांना जलद प्रतिसाद देऊन मदत पुरविली जाते. परभणी जिल्ह्याने राज्यातून या सुविधेत मोलाची कामगिरी बजावून दुसरा क्रमांक मिळविला आहे.
टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा नागरिक, महिला व बालकांच्या तसेच वृद्धांच्या मदतीसाठी अपघातसमयी तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. - रागसुधा.आर, पोलीस अधीक्षक.
८६३ नागरिकांना केली ऑगस्टमध्ये मदतऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ८६३ नागरिकांनी डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना हवी असलेली मदत जिल्हा पोलीस दलाने केली. राज्यात परभणी पोलीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत पुरविण्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.