परभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेल्या पहिल्या ठरावांचेच अद्याप अनुपालन केले जात नसल्याच्या कारणावरुन संतप्त सदस्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना धारेवर धरत बैठकीतून बाहेर काढले.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावना नखाते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जि.प.मध्ये शिक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या प्रारंभीच समितीचे सदस्य अजय चौधरी यांनी यापूर्वीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयावरील अनुपालनाचा विषय उपस्थित केला. समितीच्या पहिल्या बैठकीत जे ठराव घेतले होते, त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही, या संदर्भात इतर सदस्य व नागरिकांच्या प्रश्नांना आम्हाला उत्तर द्यावे लागते. ठरावांची अंमलबजावणीच होत नसेल तर निष्क्रिय अधिकार्यांची गरजच काय? असा त्यांनी सवाल केला. यावेळी इतर सदस्यांनीही शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
जिल्हा परिषद शाळांमध्ये उपस्थितीच्या अनुषंगाने बायोमेट्रीक मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १४ व्या वित्त आयोगातून ग्रा.पं.च्या माध्यमातून या मशीन खरेदी करण्याच्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींना याबाबत पत्र देण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु, गरुड यांनी या संदर्भात कोणताही आदेश काढला नाही. जिल्हा परिषद शाळांचे क्रीडांगण विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडाधिकार्यांनी याबाबत जिल्हा परिषदेला पत्र पाठविले होते. गेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली होती. त्यानुसार सर्व गटशिक्षणाधिकार्यांना शिक्षणाधिकार्यांनी पत्र पाठवून सर्व जि.प. शाळांच्या क्रीडांगणांची माहिती मागवून घ्यावी, असे ठरले होते. यावरही गरुड यांनी कोणतेही पत्र काढले नाही.
जिल्ह्यात ज्या ७८ शाळा ई-लर्निंग करण्यात आल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी जि.प.सदस्य अजय चौधरी, डॉ.सुभाष कदम व सुषमा देशमुख या तीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने गरुड यांनी स्वतंत्र पत्र काढून संबंधित शाळांना तशा सूचना देण्याचे आदेश समितीच्या बैठकीत देण्यात आले होते. परंतु, गरुड यांनी तसे कोणतेही पत्र काढले नाही. याशिवाय पहिल्या बैठकीपासून दहा ठराव असे आहेत, ज्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी गरुड यांना काम करायचे नाही, केवळ टाळाटाळ करायची आहे, असे सांगून उपस्थित बहुतांश सदस्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर जावे, असे सांगितले. सदस्यांचे त्या कामच ऐकत नाहीत, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करीत नाहीत, त्यामुळे त्यांची बैठकीतील उपस्थिती काय उपयोगाची आहे, असे म्हणून त्यांना बैठकीबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर गरुड या बैठकीबाहेर निघून गेल्या. या बैठकीस सदस्य पार्वती वाघमारे, उमा वाकणकर आदींची उपस्थिती होती.
सक्तीच्या रजेवर पाठविण्याची सीईओंकडे मागणीबैठकीनंतर सभापती भावना नखाते यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याशी फोनवर संवाद साधला. शिक्षणाधिकारी गरुड यांचा कारभार असमाधानकारक असून त्या कार्यालयात सदस्यांना भेटत नाहीत, समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशा समितीतील सर्व सदस्यांच्या भावना आहेत. त्यामुुळे या अनुषंगाने निर्णय घ्यावा, अशी मागणी सवडे यांच्याकडे केली. त्यावर सवडे यांनी सध्या बैठकीसाठी औरंगाबादला आहे. आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगितले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाची उधारी चुकती होईना
शिक्षण विभागाने दोन आठवड्यापूर्वी घेतलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभातील विविध बाबींची देयके संबंधित कंत्राटदारांना अद्यापही देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संबंधित कंत्राटदार शिक्षणाधिकारी कार्यालयात सातत्याने बिलासाठी चकरा मारत आहेत. परंतु, शिक्षणाधिकारी गरुड या त्यांना भेटत नाहीत. त्यामुळे हे कंत्राटदार सातत्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. केवळ आपल्या शब्दाखातर त्यांनी उधारीत मंडप, स्पीकर, जेवणाची व्यवस्था आदींची कामे केली. आता कार्यक्रम होऊनही त्यांचे पैसे मिळत नसतील तर त्यांना सामोरे कसे जायचे, असा सवालही यावेळी सदस्यांनी उपस्थित केला.