लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत या निविदा अंतिम होणार आहेत.परतीचा पाऊस झाला नसल्याने यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दोन महिन्यांचा पावसाचा खाडा राहिल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथून पुढे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृती आराखडे जाहीर केले होते. या कृती आराखड्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत काम करण्याची वेळ प्रशासनावर आली नसली तरी भविष्यात मात्र पाणीटंचाईच्या निवारणासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.सध्याची परिस्थिती लक्षात घेता टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत चालली आहे. पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना ठप्प पडू लागल्या असून गावातील पाणीसाठा संपत असल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढावली आहे. टंचाई परिस्थितीत ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन आठ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल्या आहेत. यावर्षी १०० पेक्षा अधिक टँकर लावण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. या निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची वेळ आली असून येत्या एक- दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष टँकरचे आदेश काढले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.१२३ रुपये प्रति मे टन भाडे४जिल्ह्यामध्ये करार तत्वावर टँकर्स घेतले जात असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या टँकरचे दरही निश्चित झाले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत भाडे तत्वावर लावल्या जाणाऱ्या टँकर्सची निश्चिती केली जाणार आहे. अंतिम झालेल्या निविदांमधून पाणीपुरवठ्यासाठी घेतलेल्या टँकरला १२३ रुपये प्रति दिन प्रति मे.टन भाडे दिले जाणार आहे. तर प्रवासासाठी १.८९ रुपये प्रति मे. टन प्रति कि.मी. या दराने टँकर्स लावले जाणार आहेत.५४ वाढीव टँकरचे नियोजन४मागील वर्षी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये प्रशासनाला ४६ टँकर्सच्या सहाय्याने पाणीपुरवठा करावा लागला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे. त्यामुळे १०० टँकरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून पुढील वर्षातील मार्च महिन्यापर्यंत टँकरची संख्या १०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
परभणी : १०० टँकरचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 12:53 AM