लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने २०१७-१८ या वर्षांतील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़ यामध्ये प्राथमिक विभागातील ९, माध्यमिक विभागातील ४ आणि एका शिक्षकांची प्रोत्साहनपर उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे़माजी राष्ट्रपती डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो़ त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षकांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात येते़ २०१७-१८ या वर्षातील उत्कृष्ट शिक्षक म्हणून १४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे़ यामध्ये प्राथमिक विभागात सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील शिक्षक वसंत आण्णासाहेब डासाळकर, पाथरी शहरातील नामदेव नगर शाळेचे हरिदास कोंडीबा कावळे, गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा शाळेच्या मीरा माधवराव सूरनर, पालम तालुक्यातील कोळवाडी शाळेचे विजयकुमार आश्रोबा पंडित, पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील प्राथमिक शाळेचे सिद्धार्थ विठ्ठलराव मस्के, परभणी तालुक्यातील उखळद येथील उर्दू शाळेचे शेख मुन्तजीब शेख बाबू, जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथील शाळेचे शिक्षक तुकाराम कनीराम चव्हाण, सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथील शाळेचे दत्ता केशवराव पवार तर मानवत तालुक्यातील उक्कलगाव जि़प़ प्राथमिक शाळेचे दिगंबर एकनाथराव भिसे यांची निवड करण्यात आली आहे.माध्यमिक विभागात परभणी तालुक्यातील झरी शाळेचे उदय वसंतराव कुलकर्णी, सोनपेठ शहरातील जिल्हा परिषद शाळेचे किशोर बन्सी धीवार, पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव शाळेचे श्रीकांत शिवाजी क्षीरसागर, जिंतूर तालुक्यातील भोगाव शाळेचे पंढरीनाथ मुगाजी बुधवंत या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़ पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे या शाळेचे शिक्षक बालाजी चुडाजी शिंदे यांना प्रोत्साहनपर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़पुरस्कारांचे आज होणार वितरणजिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे १४ शिक्षकांना शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वितरण होणार आहे़ या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या हस्ते होणार आहे़ अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांची उपस्थिती राहणार आहे़ तर प्रमुख पाहुणे म्हणून वनामकृविचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जि़प़ उपाध्यक्षा तथा शिक्षण उपसभापती भावनाताई नखाते यांनी दिली़ यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जाणार आहे.
परभणी : जिल्ह्यातील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:11 AM