जयंत मते।लोकमत न्यूज नेटवर्कवझर बु़ (परभणी) : जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़१५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास वझर आणि परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसात ३३ केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळले़ परिणामी, १६ गावांमधील वीज पुरवठा बंद झाला आहे़ वीज नसल्याने या गावात पाण्याचा प्रश्नही अधिकच बिकट झाला आहे़ शिवाय घराबाहेर रात्र काढावी लागत आहे़ वीज वितरण कंपनीने अजूनही दुरुस्तीची कामे सुरू केली नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे़ सायखेडा, बेलखेडा, कवडा, उमरद, सावंगी, धमधम, असोला इ. गावांतील वीज पुरवठा खंडित झालेला आहे़ विशेष म्हणजे सावंगी भांबळे परिसरात ३५ ते ४० विजेचे खांब पडले आहेत़ सोमवारी सायंकाळी खंडित झालेला वीज पुरवठा शनिवारी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता़ वीज वितरण कंपनी संथगतीने काम करीत आहे़ शुक्रवारी या भागात विजेचे खांब आणून टाकले आहेत़ सहा दिवसानंतर आतापर्यंत केवळ खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे़ उन्हाळ्यातील कडक ऊन आणि रात्री उकाडा सहन करावा लागत असल्याने वीज कंपनीच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़ एकदाच १६ गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणीपुरवठ्यासह दैनंदिन प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़
परभणी : वझर परिसरातील १६ गावे ५० तासांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:28 AM