परभणी: आदिवासी साहित्याचा ३७३ कोटींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:19 PM2019-08-23T23:19:36+5:302019-08-23T23:20:35+5:30
आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): आदिवासी समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी दुपारी गंगाखेड येथे दाखल झाल्यानंतर आयोजित जाहीर सभेत खा.कोल्हे बोलत होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.सतीश चव्हाण, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विक्रम काळे, आ.विजय भांबळे, माजी खा. सुरेश जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इसाक जहागीरदार, सुरज चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. म्हणूनच त्यांच्या महाजनादेश यात्रेत पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे. पोलीस बंदोबस्त बाजुला ठेवून यात्रा काढा, तुम्हाला तरुण रस्त्यावर फिरु देणार नाहीत, असेही ते म्हणाले. आदिवासी बांधवांच्या साहित्य खरेदीत ३७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. साहित्याचा नागपूरला एक तर अमरावतीला एक तर नाशिकला एक असे वेगवेगळे दर ठरविले गेले. यातून कोट्यवधी रुपये लुटले गेले. राज्यातील ३५३ पैकी १५१ तालुक्यात दुष्काळ आहे. मुख्यमंत्रीच म्हणाले होते, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले, मग हे पैसे गेले तरी कुठे, असेही ते म्हणाले.
राज्यात गेल्या चार वर्षात १ लाख २५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात १६ हजार ५०० बलात्काराचे तर ३७ हजार ५०० विनयभंगाचे गुन्हे आहेत. माता- भगिनी राज्यात सुरक्षित नाहीत. तुमचा एकमंत्री दारुला बाईचे नाव द्या, असे सांगतो, त्यांना लाज वाटत नाही का? असा सवालही खा.कोल्हे यांनी केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने पाच वर्षात २ लाख ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून राज्य दिवाळखोरीत घातले आहे. सरकारमुळे अनेक शेतकरी जीव देण्याच्या विचारात आहेत. शिक्षकांनीही अवयव विक्रीस काढले आहेत. मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केला.
यावेळी अॅड.मिथिलेश केंद्रे, श्रीकांत भोसले, माधव भोसले, वसंत सिरस्कर, शहाजी देसाई, स.अकबर इमदाद पठाण, हाजी कुरेशी, गिरीष सोळंके, देविदास चव्हाण, लिंबाजी देवकते, अप्पासाहेब जाधव, शंकर वाघमारे, गजानन अंभुरे, कादरभाई गुळखंडकर आदींची उपस्थिती होती.
विरोधी पक्षाचा आमदार असल्याने अन्याय -डॉ.मधुसूदन केंद्रे
४गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्याने राज्यातील सरकारने विकासकामांसाठी मदत केली नाही. दुष्काळ, पीक विमा देताना आखडता हात घेतला.
४शेतकरी विमा योजनेपासून वंचित ठेवले. तरीही विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामांसाठी ४८० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असल्याचे यावेळी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी सांगितले.
४शेतकऱ्यांना लुटणारे जेलमध्ये गेले तरी जेलमधून निवडणूक लढविणार असल्याचे म्हणत आहेत. तर बँकेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली गंगाखेड विधानसभेतील शेकडो तरुणांना नोकºया वाटपाचा कार्यक्रम केला जात असल्याची टीका सीताराम घनदाट यांच्यावर यावेळी डॉ. केंद्रे यांनी केली.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
४पाथरी- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.
४यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, माजी अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष मीनाताई भोरे, जुनेद दुर्राणी, दादासाहेब टेंगसे, सभापती अनिल नखाते, एकनाथ शिंदे, चक्रधर उगले, उपनगराध्यक्ष हन्नान खान, राजीव पामे, जि.प.सदस्य मीरा टेंगसे, एकनाथ घांडगे, माधवराव जोगदंड, विठ्ठल सूर्यवंशी, मुजाहेद खान, राजेश ढगे आदींची उपस्थिती होती.
४दरम्यान, सकाळी १० वाजता मानवत रोड ते पाथरी अशी १५ कि.मी.दुचाकी रॅली काढून शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले.
बाजार समित्या मोडीत काढण्याचे काम -पवार
४पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीकोनातून काम करणाºया बाजार समित्या मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारकडून सुरु आहे. तसेच राज्यात महिलांवर अन्याय -अत्याचार वाढले आहेत, असेही ते म्हणाले.
सभेत उपाध्यक्षाचे पॉकेट मारले
४पाथरी येथील राष्ट्रवादीच्या सभेत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम ऊर्फ बंडू शिंदे पाटील यांचे पॉकेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. पॉकेटमध्ये १० हजार रुपये, आधार कार्ड, पॅनकार्ड, एटीएमकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे होती. याबाबत उत्तम शिंदे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.