लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गेल्या ५ महिन्यांत तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, आजघडीला खड्डे बुजविलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम झाल्याने हा खर्च वाया गेल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे़राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती; परंतु, या संदर्भात वेळेत काम झाले नसल्याने पाटील यांची घोषणा हवेतच विरली होती़ असे असले तरी खड्डे दुरुस्तीसाठी निधीची तरतूद मात्र त्यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती़ डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७१ रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल १७ कोटी १५ लाख रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये ३० जिल्हा मार्गांचा समावेश होता़ यासाठी ९ कोटी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ त्यानंतर मार्च २०१८ अखेरपर्यंत ३० रस्ता दुरुस्ती कामांसाठी जवळपास ८ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या़ त्यानुसार बहुतांश रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले; परंतु, कामाचा दर्जा समाधानकारक राहिला नसल्याने खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर आता जैसे थे स्थिती पहावयास मिळत आहे़ परिणामी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत़ विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचे काम विशिष्ट कंत्राटदारांनाच देण्यात आले आहे़ त्यामुळे केलेल्या कामांची पडताळणी काटेकोरपणे केली गेली नाही़ आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत़ त्यामुळे ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराला दिले होते़, त्या कंत्राटदाराने सदरील काम केले किंवा नाही? याबाबतही आता ठामपणे सांगता येत नाही़ परिणामी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेला जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च वाया गेला आहे़खड्ड्यांमुळे झालेल्या नुकसानीची सरकारविरूद्ध मागता येते भरपाईमुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक ८/२००५ आणि ५/२००५ या संदर्भाने जनहित याचिका क्रमांक ७१/२०१३ मध्ये न्या़ अभय ओक व न्या़ भडंग यांच्या न्यायालयाने या संदर्भात २० मे २०१५ रोजी निकाल दिला होता़ त्यामध्ये राज्य घटनेच्या अनुच्छेद २१ प्रमाणे नागरिकांना दिलेल्या जीवन जगण्याच्या अधिकारात खड्डेमुक्त रस्ते हा देखील मुलभूत अधिकार आहे़ मुलभूत अधिकाराची सरकारने अंमलबजावणी करण्याबरोबरच या अधिकाराचे उल्लंघन झाल्यास नागरिक सरकारविरूद्ध भरपाईसाठी दावा दाखल करू शकतात, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे़, अशी माहिती परभणी येथील अॅड़ जीवन पेडगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़विधि सेवा प्राधिकरणकडे केवळ २२ तक्रारीमुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात स्वत:हून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने ३ आॅगस्ट २०१७ रोजी निर्णय दिला़ त्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी नोडल आॅफीसर म्हणून जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणच्या सचिवांची नियुक्ती केली़ विधी सेवा प्राधिकरणच्या सचिवांकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित नगरपालिकांना याविषयी कळविण्याची जबाबदारी सचिवांकडे सोपविण्यात आली होती़ त्यानुसार जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव न्या़ शेख अकबर शेख जाफर यांनी २४ आॅगस्ट २०१७ रोजी याबाबत ‘लोकमत’च्या माध्यमातून आवाहन केले होते़ त्यानंतर परभणी शहरातील २० व गंगाखेड आणि पूर्णा शहरातील प्रत्येकी १ अशा २२ तक्रारी त्यांच्याकडे आल्या़ त्या अनुषंगाने त्यांनी संबंधित नगरपालिकांना रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या़ या अनुषंगाने आणखी काही तक्रारी असतील तर संबंधितांनी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणकडे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन सचिव न्या़ शेख अकबर यांनी केले आहे़राज्य रस्त्यावर खड्डेयेलदरी- परभणी ते फाळेगाव या राज्य रस्त्यावर मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत़ अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ढुंकूनही पाहिले नाही़ दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली आहे़ खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागते़ खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी उपसरपंच प्रमोद चव्हाण, श्यामराव माकोडे यांनी केली आहे़खड्डेयुक्त रस्त्यांमुळे दमछाकमानवत- शहरातील विविध भागातील खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाहन चालकांची दमछाक होत आहे़ संत सावता माळी चौक ते वळण रस्त्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत़ त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत़ याशिवाय तालुक्यातील मानोली गावाला जाणाºया रस्त्यावर एवढे खड्डे झालेत की, रस्ता नेमका कुठे आहे? हेच समजत नाही़ वर्षानुवर्षापासूनची ही स्थिती असून, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस दुरवस्थेत भर पडत आहे़ परिणामी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़पूर्णा तालुक्यातही दुरवस्थापूर्णा- तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ काही महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण केला़ आलेला निधी खर्च केला;परंतु, खड्डे मात्र जैसे थे आहेत़ दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात भर पडली़ शहरी भागातील नागरिकांबरोबरच ग्रामस्थही खड्ड्यांमुळे जेरीस आले आहेत़ एकाही गावाला जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे़ तरीही प्रशासन गप्प आहे़गंगाखेड रस्त्याची दुरवस्थापरभणी- खड्ड्यांमुळे राज्यभरात गाजलेल्या गंगाखेड रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न अजूनही कायम आहे़ सामाजिक संस्थांच्या आंदोलनानंतर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली़ परंतु तीही अर्धीच केली़ सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन रस्त्यासाठी २०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ परंतु, अजूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही़ त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे़ ब्राह्मणगावपासून ते दैठण्यापर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत़सहा महिन्यांत आठ बळीजिंतूर- शहरातून जाणाºया चारही महामार्गाची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे हे महामार्ग मृत्यूचे सापळे बनले आहेत़ सहा महिन्यांमध्ये या मार्गावर आठ जणांचे बळी गेले असून, अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही़१६ जुलै रोजी जिंतूर शहराजवळ झालेल्या अपघातात दोघांचे बळी गेले़ त्यामुळे तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे़ खड्ड्यांमुळेच बहिण-भावांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमधून बांधकाम विभागाविषयी संताप व्यक्त केला जात आहे़ जिंतूर-परभणी हा रस्ता सर्वाधिक धोकादायक ठरत आहे़ या रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या तात्पुरत्या स्वरुपात वळण रस्त्याने वाहतूक होते़ हा रस्ता कच्चा असल्याने पाऊस झाल्यानंतर दुचाकी वाहने घसरून पडत आहेत़तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत़ मागील महिन्यात येलदरी रोडवर खड्ड्यांमुळे दोघांचे बळी गेले होते़ तर चांदजपाटीजवळ एकाचा बळी गेला होता़ जिंतूर-औंढा रस्त्यावर दोन अपघातात तिघांचे बळी गेले़ जिंतूर-जालना महामार्गावर मागील महिन्यात रस्त्यामुळे एकाचा बळी गेला होता़ परभणी रस्त्यावर तर वाहन चालविताना जीव धोक्यात घालावा लागत आह़े़ काही दिवसांपूर्वी जिंतूर- औंढा मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते़ आज या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे़
परभणी : खड्डे दुरुस्तीचे २५ कोटी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:35 AM