लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. वाळूच्या वाहतुकीसाठी टिप्पर, ट्रॅक्टर या वाहनांबरोबरच गाढवांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. महसूलचे पथक प्रत्येक वेळी ट्रॅक्टर, टिप्पर या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाळू माफियांनी शक्कल लढवित गाढवांचा वापर वाढविला होता. गोदावरी नदीपात्रातून उपसलेली वाळू गाढवांच्या सहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेली जात होती. या ठिकाणी वाळूचा साठा केल्यानंतर तेथून वाहनांच्या सहाय्याने वाळू वाहतूक होत होती. त्यामुळे दिवसाढवळ्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरुन नेली जात असल्याचे लक्षात आल्याने ११ डिेसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्यासह नायब तहसीलदार किरण नारखे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, अक्षय नेमाडे, गजानन फड, रुपेश मुलंगे, दिलीप कासले यांच्या पथकाने धारखेड भागात वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं पकडली. तहसीलचे पथक कारवाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर गाढवांच्या मालकांनी तेथून धूम ठोकली. पथकाने पकडलेली गाढवं धारखेड ग्रामपंचायतीचे सेवक मुंजाजी मुगाजी चोरघडे यांच्या ताब्यात दिली असून ग्रा.पं.च्या कोंडवाड्यात ही गाढवं बंदिस्त करण्यात आली आहेत. पकडलेल्या २६ गाढवांचे मालक कोंडवाड्याकडे आले तर त्यांना परस्पर गाढवं न देता तहसील कार्यालयात हजर होण्याच्या सूचना सरपंच, ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत....तर गाढवांचा होणार लिलावअवैध वाळू वाहतूक करणारे गाढवं धारखेड ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बंदिस्त करण्यात आली आहेत. या गाढवांचे मालक समोर येण्यासाठी तीन दिवसांचा कालवधी दिला असून या तीन दिवसांत गाढवं नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही तर तहसील प्रशासनाच्या वतीने २६ गाढवांचा लिलाव केला जाईल, अशी माहिती तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी दिली.एक गाढव दगावलेदरम्यान, तहसील प्रशासनाने २६ गावढं धारखेड येथील ग्रा.पं. कार्यालयात बंदिस्त केल्यानंतर एक गाढव दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीनिवास कारले यांनी धारखेड येथे जावून शवविच्छेदन केले. हे गाढव कशामुळे दगावले, हे समजू शकले नाही.
परभणी : २६ गाढवं कोंडवाड्यात;मालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:32 AM