लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या कापूस खरेदीने जिल्ह्यातील गोदामे फुल्ल झाली असून सद्यस्थितीला कापसाच्या ६१ हजार गाठींची साठवणूक करण्यात आली आहे. सोमवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरु होणार असल्याने पणन महासंघाच्या वतीने जागेचा शोध घेतला जात आहे.यावर्षी जिल्ह्यात पणन महासंघ आणि सीसीआयच्या वतीने कापसाची खरेदी करण्यात आली. हमीभावाप्रमाणे कापसाला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कापूस या केंद्रांवर विक्रीसाठी दाखल झाला. जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील करम येथे पणन महासंघाच्या वतीने कापसाची खरेदी करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ३ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या कापसाच्या गाठी तयार करुन त्याची साठवणूक केली जाते. पणन महासंघाने बुलडाणा अर्बन आणि वखार महामंडळाच्या गोदामामध्ये कापूस गाठी साठवून ठेवल्या आहेत. आतापर्यंत ६१ हजार गाठींची साठवणूक झाली असून ६२ हजार ७०० कापूस गाठी अजूनही तयार आहेत. त्याच प्रमाणे गोदामांच्या क्षेत्रात ६ हजार गाठी शिल्लक आहेत. साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती.आता नव्याने कापसाची खरेदी करण्यासाठी साठवणुकीच्या जागांचा शोध घेतला जात आहे. यासाठी बुलडाणा अर्बन, वखार महामंडळाबरोबरच खाजगी जागांचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापूस लक्षात घेता, गोदामे उपलब्ध करुन साठवणुकीची जागा निर्माण केली जाणार असल्याची माहिती पणन महासंघाच्या वतीने देण्यात आली.५० टक्के कापसाची आवक होण्याची शक्यता४जिल्ह्यात आतापर्यंत पणन महासंघाच्या वतीने ३ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून आणखी तेवढाच कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात ३ लाख क्विंटल कापसाची आवक होईल, असे गृहित धरुन कापूस पणन महासंघाकडून गोदामांची निवड केली जाणार आहे.सोमवारपासून खरेदीची शक्यता४कापूस गाठी साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याने कापसाची खरेदी बंद करण्यात आली होती; परंतु, मध्यंतरीच्या काळात साठवणुकीसाठी थोडीफार जागा शिल्लक झाली आहे. तसेच सरकीही विक्री केल्यामुळे जागा उपलब्ध झाली आहे. तसेच नवीन गोदामांचाही शोध घेतला जात असून तात्पुरत्या स्वरुपात बंद केलेली कापसाची खरेदी पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रभारी व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी परभणी, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहेत. तेव्हा सोमवारपासून कापूस खरेदी सुरु करावी, असे सूचित करण्यात आले आहे.
परभणी : ५० टक्के कापसाची आवक होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 11:56 PM