लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्याला जोडणाऱ्या पाचही परजिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त लावला असतानाही बंदोबस्तावरील पथकाला हुलकावणी देऊन तसेच चोरट्या मार्गाने जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात तब्बल ३३० नागरिक आले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या सर्व व्यक्तींना त्या त्या परिसरात डॉक्टरांच्या निगराणीखाली क्वारंटाईन करण्यात आले आहे.परभणी जिल्ह्याला पाच जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बहुतांश प्रमुख सीमांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला असला तरी काही ठिकाणी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांकडून चुका होत असल्याची बाब समोर आली आहे. परभणीत आढळलेला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ढालेगाव येथील सीमेवरुनच दुचाकीद्वारे जिल्ह्यात दाखल झाला. त्यावरुनच जिल्ह्यांच्या सीमांवरील बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या अनुषंगाने शुक्रवारी दिवसभर किती नागरिक जिल्ह्यात दाखल झाले, याचा आढावा घेतला असता धक्कादायक आकडेवारी समोर आली. परभणी तालुक्यात ३६ नागरिक दिवसभरात दाखल झाले. त्यामध्ये शुक्रवारी दुपारी मुंबईतील मुंब्रा येथून दोघेजण परभणीतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये येणार असल्याची माहिती काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख, विश्वजीत बुधवंत व अक्षय देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदरील तरुणांशी मोबाईलवर संपर्क साधला व त्याचे लोकेशन घेतले असता हे दोघे चालत पोखर्णी ते तरोडा दरम्यान आले असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना तेथेच थांबण्यास सांगण्यात आले व तातडीने परभणीहून रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी देशमुख व बुधवंत पोहचले. त्यांनी दोन्ही व्यक्तींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले व येथे त्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील वसमतरोड परिसरात चार जण पुण्याहून आल्याची बाब येथील मनपा कर्मचाºयांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या चारही जणांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभरात शहर व तालुक्यात इतर ३० जण दाखल झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. सेलू व पालम तालुक्यात दिवसभरात प्रत्येकी २८ जण तर पाथरी तालुक्यात २४, जिंतूर तालुक्यात ११३ जण दाखल झाले. सोनपेठ तालुक्यात ५२ नागरिक परजिल्ह्यातून दाखल झाले. गंगाखेड तालुक्यामध्ये १४ नागरिक दाखल झाले. पूर्णा तालुक्यात जवळपास १९ दक्षिण भारतीय नागरिक वसमत तालुक्यातील पांगरा येथून येत असल्याची माहिती पोलिसांना सायंकाळी ६ वाजता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जावून ताब्यात घेतले व आरोग्य तपासणीसाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे नागरिक तामिळनाडू राज्यातील असल्याचे समजते. या नागरिकांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांना शहरातील अभिनव शाळेतील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार वंदना मस्के यांनी दिली.अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची ढालेगाव नाक्यास भेट४अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर.रागसुधा यांनी १७ एप्रिल रोजी दुपारी ढालेगाव येथील तपासणी नाक्याला अचानक भेट दिली. यावेळी येथील राष्ट्रीय महामार्गावरील सोनपेठ टी पॉर्इंट परिसरात दोन दुचाकीस्वार व एक जीपचालक विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले. त्यांनी या तिन्ही वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर आर.रागसुधा यांनी ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील पोलीस कर्मचाºयांच्या कक्षाला भेट दिली.जिंतूर तालुक्यात ११३ नागरिकांना शिरकाव४जिंतूर: नागपूर जिल्ह्यातील मोदा येथील व्यंकटेश्वर शुगर फॅक्ट्री येथे ऊसतोडीसाठी ५१ ऊसतोड मजूर गेले होते. हे मजूर ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३७ एफ ०८२९, एम.एच.२३-टी ५२९६ ने आपल्या गावी परतत असताना आडगाव फाटा येथे लावण्यात आलेला जिल्हा नाका सोडून चोरट्या मार्गाने जिंतुरात प्रवास करीत होते. त्याचवेळेस रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी लोखंडे यांनी त्यांना ताब्यात घेतले. या सर्व मजुरांना पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यामधील काही ऊसतोड मजूर माजलगाव तालुक्यातील असल्याने त्यांना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास माजलगाव येथील महसूलचे कर्मचारी या मजुरांना घेऊन जाण्यासाठी दाखल झाले होते. या कर्मचाºयांसोबत २५ मजुरांना पाठविण्यात आले; परंतु, पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील जिल्हा बंदी नाक्यावर महसूल कर्मचाºयांसह या २५ मजुरांना प्रवेश नाकारला. त्यामुळे पुन्हा या मजुरांना जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अनुसूचित जाती जमाती शासकीय निवासी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्याच बरोबर जिंतूर तालुक्यातील २८ जणांना शहरातील अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. १० ते ११.३० या दीड तासामध्ये बाहेर जिल्ह्यातून ५१ नागरिक जिंतूर शहरामध्ये दाखल झाले होते. यामध्ये पुणे येथून ४, माजलगाव ४, औरंगाबाद १३, देहू १, जालना ४, अमरावती १, हिंगोली २, शिरुर १९, बीड ४ या प्रमाणे नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणखी ९ जण दाखल झाले होते. अशा एकूण ६० नागरिकांची दिवसभरात तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, बाहेरगावाहून येणाºया नागरिकांना कुठल्याही छुप्या मार्गाने तालुक्यात शिरकाव करता येऊ नये, यासाठी दुसºया जिल्ह्यालगत सीमा असलेल्या १३ गावांमध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये सावंगी म्हाळसा, डिग्रस, देवसडी, हिवरखेडा, घडोळी, सावळी बु., टाकळखोपा, निलज, गणेशनगर, भुसकवडी, आडगाव, गडदगव्हाण, दाभा या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली.
परभणी : दिवसभरात ३३० जणांचा जिल्ह्यात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:22 PM