लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, मतदार यादीत नाव नोंदविणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत असून, हीच मतदार यादी लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी केले आहे.सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेस अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांची उपस्थिती होती. शिवशंकर म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २५६६७, नाव वगळण्यासाठी ३२६४, दुरुस्ती करण्यासाठी २२४२ आणि नाव स्थलांतरित करण्यासाठी ३४९ असे ३१४१२ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले असून, या अर्जांची डाटा एन्ट्री सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंतचीच मतदार यादी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी म्हणून जाहीर होणार आहे. तेव्हा नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. जिल्ह्यासाठी २९८९ बॅलेट युनिट, १७३६ कंट्रोल युनिट आणि १७३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले असून, सोमवारपासून मतदार यंत्रांची प्राथमिकस्तरावरील तपासणी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही तपासणी केली जात आहे. तसेच एक दिवस मतदान यंत्र निवडणूक मॉक पोलही घेतले जाणार आहे, असे शिवशंकर यांनी सांगितले.
परभणी : मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:06 AM