परभणी: सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे. दोन दिवसापूर्वी नोंद झालेल्या ३ अंश या निच्चांकी तापमानात सोमवारी केवळ ०.६ अंशाची वाढ झाली असून संपूर्ण जिल्ह्यात हुडहुडी भरणारी थंडी आहे.
मागील आठवड्यात तापमानात घट होण्यास प्रारंभ झाला. शनिवारी ३ अंशावर पारा स्थिरावला. १५ वर्षातील थंडीचा विक्रम शनिवारी मोडीत निघाला. दोन दिवसानंतरही या तापमानात फारसी वाढ झाली नाही. रविवारी ३.३ अंश आणि सोमवारी ३.६ अंश नीचांकी तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने घेतली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही थंडी कायम आहे. पहाटे थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. सायंकाळी देखील लवकरच रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण होत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर वाढला आहे. तसेच शेकोट्याही पेटवल्या जात आहेत.