लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी ): येथील येलदरी धरणामध्ये सद्यस्थितीत ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला असून सिद्धेश्वर धरणामध्ये ७५.५२ टक्के पाणी झाले आहे.बुुलढाणा जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने येलदरीच्या वरील खडकपूर्णा धरण भरले आहे. त्यामुळे खडकपूर्णाच्या पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत करण्यात आला. त्यामुळे पूर्णेतून हे पाणी येलदरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षानंतर येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आता धरणात ७९३.९८९ दलघमी म्हणजेच ९८.११ टक्के जीवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत या धरणात ६.५२८ दलघमी पाणी दाखल झाले. यातील ६.३८७ दलघमी पाण्याचा विद्युत निर्मिती केंद्रातून विसर्ग करण्यात येत आहे. येलदरीतून सोडलेले पाणी हिंगोली जिल्ह्यात असलेल्या सिद्धेश्वर धरणामध्ये जमा झाले आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातही सद्यस्थितीला ७५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत या धरणात ७.२३१ दलघमी पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. येलदरी व सिद्धेश्वर या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याने परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील अनेक गावांचा व शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिवाय सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
परभणी: येलदरीत ९८ तर सिद्धेश्वरमध्ये ७५ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:57 PM