लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये दमदार पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही जिल्ह्यामध्ये २० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नसून आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७७४ मि.मी. पाऊस होतो. १ जूनपासून ते २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६७३.५१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ५३३.७० मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत. मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसल्याने चिंता वाढल्या आहेत. येलदरी प्रकल्पात आताकुठे केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. तर निम्न दुधना प्रकल्प अजूनही मृतसाठ्यात आहे. या दोन्ही प्रकल्पांवर जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. मात्र प्रकल्पात पाणी उपलब्ध झाले नाही.परभणी, सेलू, जिंतूर तालुक्यात कमी पाऊस४परभणी तालुक्यामध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५७.५ टक्के पाऊस झाला आहे. तर पालम तालुक्यात ८७.२ टक्के, पूर्णा ९२.०३, गंगाखेड ८९.२, सोनपेठ ८२.७, सेलू ६८.७, पाथरी ८९.७, जिंतूर ६८.६ आणि मानवत तालुक्यात ८२.६ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा वगळता इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण असमाधानकारक आहे. त्यातही परभणी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.
परभणी : २० टक्के पावसाची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:25 AM