परभणी : सलग दुसऱ्या दिवशी परभणीचा पारा घटला असून, तापमान ५.४ अंशावर स्थीर राहिले आहे. त्यामुळे बुधवारीही जिल्ह्यात थंडीचा कहर कायम राहिला.
मागील तीन आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्यंतरी मागील आठवड्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र एकदा थंडी सक्रीय झाली आहे. सोमवारी परभणी जिल्ह्यात १४ अंश सेल्सीयस किमान तापमनाची नोंद झाली होती. मंगळवारी तापमानात मोठी घट होऊन किमान तापमान ६.४ अंशावर पोहोचले होते. तापमानात होणारी घट बुधवारीही कायम राहिली. बुधवारी किमान तापमानात १.२ अंशाची घट झाली असून, पारा ५.६ अंशावर स्थिरावला असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात गारठा कायम आहे.
काश्मिरमध्ये होणारी हिमवृष्टी, उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे जिल्ह्याच्या वातावरणावर परिणाम झाला आहे. कमालीचा गारवा निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत थंडी कायम रहात आहे. सायंकाळीही ६ वाजेनंतर पुन्हा थंडी वाढत असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे. हुडहुडी भरणारी थंडी पडत असल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे.