लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : येथील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी आलेल्या मुंबईतील ५ आणि इतर जिल्ह्यांतील १९ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असून,या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या बोरी येथील ३१ जणांनाही क्वारंटाईन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे़बोरी येथील एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीसाठी २२ एप्रिल रोजी मुंबई आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून नातेवाईक बोरी गावात दाखल झाले होते़ मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे़ त्यामुळे हा भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित झाला आहे़ मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नातेवाईक बोरीत आले असल्याची माहिती ग्रा़प़ं़ला मिळाल्यानंतर सरपंच सखाराम शिंपले, उपसरपंच अश्विनी चौधरी, ग्रामविकास अधिकारी एस़व्ही़ ढोणे, तलाठी सुभाष होळ, ग्रा़पं़ कर्मचारी दत्ता चौधरी यांनी या नातेवाईकांचा शोध घेवून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ या सर्वांची आरोग्य तपासणी केल्यानंतर मुंबईहून आलेल्या ५ जणांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात तर इतर जिल्ह्यातून आलेल्या १९ नातेवाईकांना अकोली येथील वसतिगृहात ठेवण्यात आले आहे़ त्याच प्रमाणे मुंबई येथील ५ नागरिकांच्या संपर्कत आलेल्या बोरीतील ३१ नातेवाईकांना येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय कन्या शाळेमध्ये क्वारंटाईन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ किरण चांडगे यांनी दिली़४० जणांविरूद्ध गुन्हाबोरी : येथील एका महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित राहिल्या प्रकरणी मुंबई व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामधून आलेल्या ४० नातेवाईकाविरूद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून हा रोग पसरविण्याची भीती निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ४० जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांनी दिली़२३ उसतोड कामगारांचे विलगीकरण४चारठाणा : परजिल्ह्यातून चारठाणा येथे आलेल्या २३ उसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करून या कामगारांचे विलगीकरण करण्यात आले आहे़ २२ एप्रिल रोजी सावरगाव, केहाळ, मोहाडी, अंबरवाडी आदी गावांमधील २३ उसतोड कामगारांना घेऊन एक ट्रक चारठाणा आरोग्य केंद्रात दाखल झाला़ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ़ शेख माजिद यांनी इन्फ्रारेड थर्मामीटरच्या सहाय्याने कामगारांची तपासणी केली़ दरम्यान, या उसतोड कामगारांना त्यांच्या गावी विलगीकरण करण्यात आले असून, कामगारांची जबाबदारी संबंधित गावांवर सरपंचावर देण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे बिहार राज्यातील तलावाचे काम करणाऱ्या ५ मजुरांनाही १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ हे कामगार सहा महिन्यांपासून जिल्ह्यातच आहेत; परंतु, काही कामानिमित्त ते सेलू येथे गेले होते़ तेथून चारठाणा गावाकडे येत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांनी या कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले़ तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशावरुन या पाचही कामगारांना ब्राह्मणगाव येथील शेतात विलगीकरण करून ठेवले आहे़
परभणी: अंत्यविधीसाठी आलेले ५४ जण ‘क्वारंटाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:14 AM