लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: मान्सून उशिराने दाखल झाल्याचा फटका जिल्हावासियांना बसला असून जून महिन्यामध्ये तब्बल ६१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५१.५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस झाल्याने जिल्हावासियांना दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र तब्बल १५ ते २० दिवस उशिराने मान्सून जिल्ह्यात दाखल झाला. असे असले तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नाही. संपूर्ण जून महिना चांगल्या पावसाची प्रतीक्षा करण्यात गेला असून शेतकºयांची पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जून महिन्यामध्ये जिल्ह्यात सरासरी १२६.६१ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. यावर्षी केवळ ६५.१५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अपेक्षित पावसाच्या तुलनेत ६१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आता यापुढील काळात ही तूट भरुन काढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.जून महिन्यामध्ये गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक ८६.७५ मि.मी. पाऊस झाला आहे. या तालुक्यात १०६ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. त्या तुलनेत केवळ ८१ टक्के पाऊस झाला. परभणी तालुक्यात ५४.५२, पालम तालुक्यात ५२.९९, पूर्णा तालुक्यात ७७.८०, सोनपेठ ६५.५०, सेलू ४३.१७, पाथरी ५१, जिंतूर ६४.६७ आणि मानवत तालुक्यात ८९.९९ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात ३७ टक्के, पालम ५० टक्के, सेलू ३५.३७ टक्के, पाथरी ३७ टक्के तर जिंतूर तालुक्यात ४३ टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
परभणी : जून महिन्यात ६१ मि.मी. पावसाची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:40 PM