लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल होत आहेत़ उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत १३४ प्रस्ताव दाखल झाले असून, तहसील कार्यालयाने ६५ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे तर ६९ प्रस्ताव प्रलंबित आहेत़जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे़ ग्रामीण भागात जलसाठे आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे़ टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असला तरी या आराखड्यानुसार दाखल झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना विलंब लागत आहे़ परिणामी प्रस्ताव मंजूर होवून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागत आहे़ प्रशासनाने विहीर, बोअर अधिग्रहण, नळ योजनांची तात्पुरती दुरुस्ती, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदी कामे हाती घेतली आहेत़सद्यस्थितीला जिल्हाभरातून १३४ प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे दाखल केले होती़ विहीर, बोअर अधिग्रहणाचे हे प्रस्ताव असून, त्यापैकी प्रत्यक्षात ६५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत़ तर २१ प्रस्ताव तहसील कार्यालयाने पंचायत समितीकडे परत पाठविले आहेत़ सद्यस्थितीला गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर ३३ प्रस्ताव प्रलंबित असून, तहसीलच्या स्तरावर १५ प्रस्ताव प्रलंबित आहेत़गंगाखेड तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव दाखल झाले आहेत़ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी अधिग्रहणासाठी ४३ प्रस्ताव दाखल केले असून, त्यापैकी २२ प्रस्तावांना तहसील कार्यालयाने मंजुरी दिली आहे़ ९ प्रस्ताव परत करण्यात आले आहेत़ पालम तालुक्यातील २३ पैकी १०, जिंतूर तालुक्यात ६ पैकी १, पूर्णा तालुक्यात १३ पैकी ४, सेलू २४ पैकी १०, सोनपेठ ९ पैकी ७, मानवत ४ प्रस्तावांपैकी ३ तर पाथरी आणि परभणी तालुक्यातील प्रत्येकी ६ प्रस्तावांपैकी ४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़ प्रलंबित प्रस्तावांमध्ये गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक २१ प्रस्ताव प्रलंबित आहेत़ सेलू तालुक्यातील १४, पालम १३, जिंतूर ५, पूर्णा ९, सोनपेठ, पाथरी, परभणी प्रत्येकी २ आणि मानवत तालुक्यातील १ प्रस्ताव प्रलंबित आहेत़ जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाºयांनी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे़तीन गावांमध्ये टँकर सुरूजिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ पालम तालुक्यातील चाटोरी या गावात प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणी दिले जात असून, याच तालुक्यातील पेंडू बु़, सादलापूर, आनंदवाड, नाव्हा या चार गावांनी दाखल केलेले टॅँकरचे प्रस्ताव प्रलंबित आहेत़ गंगाखेड तालुक्यातही गोदावरी तांडा या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे या गावात टँकर मंजूर झाला असून, बरबडी येथील टँकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहे़ जिल्ह्यातून टँकरसाठी एकूण ८ प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यात पालम तालुक्यातील ६ आणि गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी एका प्रस्तावाचा समावेश आहे़ पंचायत समितीकडे ४ प्रस्ताव प्रलंबित असून, उपविभागीय अधिकाºयांच्या स्तरावर दोन प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़नळ योजना दुरुस्तीच्या कामांना सुरुवातज्या गावांमध्ये नळ योजनेच्या जलस्त्रोताला पाणी उपलब्ध आहे; परंतु, योजनेत किरकोळ बिघाड असल्याने पाणीपुरवठा बंद आहे, अशा ठिकाणी नळ योजना दुरुस्तीच्या कामाला मागील आठवड्यात मंजुरी देण्यात आली असून, ही कामे सुरू झाली आहेत़ नळ योजनेच्या दुरुस्तीनंतर संबंधित गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास हातभार लागणार आहे़
परभणी : विहीर अधिग्रहणाचे ६९ प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:59 PM