लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील तब्बल ८१ इमारती धोकादायक असल्याची बाब महापालिकेने चार-पाच वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे़ या सर्वेक्षणाच्या आधारावर आता इमारत मालकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे़शहरात सद्यस्थितीला निजामकालीन आणि त्यापेक्षा जुन्या इमारती अस्तित्वात असल्या तरी साधारणत: ६० वर्षापूर्वी बांधकाम केलेल्या काही इमारती शहराच्या जुन्या भागात अस्तित्वात आहेत़ पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी झिरपून किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे इमारतीची भिंत कोसळून दुर्घटना घडण्याची भीती असते़ या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत दरवर्षी सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची माहिती घेणे अपेक्षित आहे़ मात्र मागील काही वर्षापासून हे सर्वेक्षण झाले नाही़ चार ते पाच वर्षापूर्वी मनपाने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते़ याच सर्वेक्षणाच्या आधारावर जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे़ दोन दिवसांपूर्वी पुणे येथे संरक्षक भिंत पडून १५ कामगार दगावल्याची घटना घडली आहे़ या पार्श्वभूमीवर परभणीत धोकादायक इमारतींसंदर्भात मनपाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला असता, जुन्या सर्वेक्षण यादीनुसारच इमारत मालकांना नोटीस देण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिल्याने आढळले असून, सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून या इमारत मालकांना सध्या नोटिसा बजावल्या जात आहेत़ महापाच्या माहितीनुसार शहरात सुमारे ७५ हजार मालमत्ता अस्तित्वात आहेत़ त्यापैकी जुन्या भागातील सुमारे ८१ इमारती धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे़ या इमारतींचे बांधकाम साधारणत: ३० ते ७० वर्षापूर्वीचे जुने आहे़ शहरामध्ये काही वर्षापूर्वी निजामकालीन इमारती अस्तित्वात होत्या़ मात्र सद्यस्थितीला ७० वर्षापेक्षा अधिक वयोमान असलेल्या आणि धोकादायक झालेल्या इमारती अस्तित्वात नसल्या तरी ७० वर्षापर्यंतच्या जुन्या इमारती शहरात असून, त्यातील काही इमारती धोकादायक असल्याची बाब या सर्वेक्षणात समोर आली आहे़ पावसाळ्यामध्ये जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती पडून धोका निर्माण होवू शकतो़ ही बाब लक्षात घेऊन मनपाने इमारत मालकांना नोटिसा बजावल्या असून, जुन्या इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर आता जुन्या इमारतीसंदर्भात नोटिसांपुढे काय कारवाई होते? की नोटिसा देऊन मनपा प्रशासन मोकळी होते ? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़शासनाच्या इमारतीही धोकादायकच्महानगरपालिकेच्या पथकाने काही वर्षापूर्वी केलेल्या या सर्वेक्षणातील शासनाच्या इमारतीही धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे़ विशेष म्हणजे धोकादायक इमारतींमध्ये महापालिकेच्या इमारतींचाही समावेश आहे़ प्रभाग समिती अ अंतर्गत एकूण २४ इमारती धोकादायक आहेत़ त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शनिवार बाजारातील जि़प़ प्राथमिक शाळेचा समावेश आहे़ या शाळेचे बांधकाम ४५ वर्षापूर्वीचे आहे़ तसेच सरदार पटेल रोडवर ४० वर्षापूर्वी बांधकाम झालेल्या मनपाच्या जनता मार्केटची इमारतही धोकादायक आहे़च्स्टेशन रोड परिसरातील पोस्ट आॅफीसची इमारत ५० वर्षापूर्वीची जुनी असून, तीही धोकादायक झाली आहे़ तर स्टेशन रोडवरील नगरपालिकेची जुनी इमारत ६० वर्षापूर्वीची असून, या धोकादायक इमारतीत मनपाचे कार्यालय सुरू आहे़ तसेच पंचायत समितीची ४० वर्षापूर्वीची बांधकाम झालेली इमारत, ग्रँड कॉर्नरवरील मनपाच्या मालकीचे जुने मटन मार्केट, कोमटी गल्लीतील महापालिकेची प्राथमिक शाळा, कच्छी बाजारातील महात्मा फुले शाळा, जायकवाडी वसाहतीतील गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची इमारत मोडकळीस आली आहे़च्आझाद रोडवरील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची इमारत, कारेगाव रोडवरील जिल्हा उद्योग केंद्राची इमारत, वसमत रोडवरील अल्पबचत कॉर्टर्स, कारेगाव रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाची निवासस्थाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत, स्टेडियमसमोरील लेडीज क्लब या शासनाच्या अखत्यारीत असलेल्या इमारतीही धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे़च्विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अल्प बचतच्या धोकादायक निवासस्थानांमध्ये भाडेकरू वास्तव्याला आहेत़ तर जिल्हा उद्योग केंद्राची इमारत, कापूस फेडरेशन, जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालय या इमारती धोकादायक असताना तेथे कार्यालयीन कामकाज चालत आहे़
परभणी : ८१ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:04 AM