लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): मोबाईलवर फोन करून एटीएमचा पासवर्ड मागवित एका शिक्षक दांपत्याच्या बँक खात्यातून ९६ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार १३ एप्रिल रोजी सेलू शहरात घडला असून या प्रकरणी २१ जून रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.शहरातील अत्रेनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक देविदास किशनराव कुलकर्णी यांना १३ एप्रिल रोजी शर्मा नामक व्यक्तीने फोन केला. बँकेचे व्यवस्थापक असल्याचे सांगून तुमचे एटीएम कार्ड बंद होत आहे. त्यामुळे तुमचा व तुमच्या पत्नी मीरा यांच्या एटीएमचा नंबर सांगा, तुमचे एटीएमकार्ड सुरू होईल, अशी बतावणी केली. त्यानंतर कुलकर्णी यांनी त्यांच्यासह पत्नीच्याही एटीएम कार्डाची संपूर्ण माहिती फोनवर सांगितली. काही वेळातच देविदास कुलकर्णी यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया सेलू शाखेच्या बचत खात्यातून ४९ हजार ७४९ हजार रुपये आणि त्यांच्या पत्नी मीरा कुलकर्णी यांच्या खात्यातील ४६ हजार ९९९ रुपये असे ९६ हजार ७४८ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी देविदास कुलकर्णी यांनी १३ एप्रिल रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी चौकशी करून २१ जून रोजी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. बीट जमादार यु.के. लाड, उमेश बारहाते, रामा हातागळे तपास करीत आहेत.
परभणी : बँकखात्यातून ९६ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:37 PM