लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : चोरी प्रकरणात संशयित म्हणून बोरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती लघुशंकेचे कारण देऊन पळून गेल्याचा प्रकार ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बोरी पोलीस ठाण्यात घडला.या संदर्भात सविस्तर माहिती अशी, बोरी येथील शेख रफीक अब्दुल हक यांना मालकाच्या शेळीसाठी बोकड पाहिजे, असे सांगून कोक येथील सय्यद हारुण सय्यद मकसूद याने तीनवेळा बोकड मागून नेले. त्यानंतर बोकड परत करण्याची मागणी शेख रफीक यांनी केली असता सय्यद हारुण याने उडवाउडवीची उत्तरे दिली.याबाबत शेख रफीक याने बोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयित सय्यद हारुण (२५) व अन्य एकाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी बोरी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांपैकी सय्यद हारुण याने लघुशंकेचा बहाणा करुन ठाण्यातून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.खोले, पोकॉ.संतोष सानप यांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला. यामध्ये सानप यांना दुखापतही झाली; परंतु, संशयित स.हारुण हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो पोलिसांना सापडला नाही. शुक्रवारीही पोलिसांनी आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे बोरी पोलिसांचे अपयश समोर आले आहे.
परभणी : पोलिसांना गुंगारा देऊन संशयित फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:43 AM