लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत २४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ६८ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ५८ परीक्षा केंद्रावर सोमवारी भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाची परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रात भौतिकशास्त्र विषयासाठी कॉपी करणाऱ्या ३७ विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केली आहे.विशेष म्हणजे त्यात एकट्या पूर्णा शहरातील संस्कृती कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ३५ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. तर जिंतूर तालुक्यातील बामणी येथील ब्रह्मेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर दोघांना कॉपी करताना पथकाने पकडले आहे.दुपारच्या सत्रामध्ये ५६ परीक्षा केंद्रावर राज्यशास्त्र विषयाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतही ३१ कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील जय जवान जय किसान कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर ३० आणि जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील संत जनार्दन कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई झाली आहे. दोन्ही विषयासाठी दिवसभरात ६८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील ६५ विद्यार्थी पूर्णा तालुक्यातील आहेत.भौतिकशास्त्र या विषयाची १२ हजार २९ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी तर राज्यशास्त्र विषयाची ७ हजार ९३५ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
परभणी : ६८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:45 PM