लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात गेला असतानाही यावर्षी या प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली नाही़ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे धरणाची साठवण क्षमता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़येलदरी प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा कमी झाला आहे़ राज्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची साठवण क्षमता वाढावी, या उद्देशाने प्रकल्पातील गाळ काढून तो शेतात टाकण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार हे अभियानही राबविले होते़ गतवर्षी याच अभियानांतर्गत येलदरी प्रकल्पातील ४ लाख २० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला होता़ अंबाजोगाई येथील मानवलोक, मारिको इनोव्हेशन संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली़ या तलावातील गाळ काढून स्थानिक शेतकऱ्यांना तो मोफत दिला होता़ गाळ उपसण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री संस्थेमार्फत देण्यात आली होती़ त्यामुळे उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा ज्या ठिकाणी कमी झाला आहे़ तेथील गाळ उपसल्याने या प्रकल्पातील पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली होती़यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच येलदरी प्रकल्पातील पाणी मृतसाठ्यात गेले आहे़ त्यामुळे हा प्रकल्प जागोजागी उघडा पडला आहे़ मृतसाठ्यामध्ये किमान ४० टक्के गाळ असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ परंतु, प्रशासकीय उदासिनतेमुळे यावर्षी गाळ काढण्याच्या कामाकडे पाठ फिरविण्यात आली़ परिणामी चांगली संधी उपलब्ध होवूनही येलदरी प्रकल्पातील गाठ उपसा होवू शकला नाही़ येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असून, धरणातील गाळ उपसला नसल्याने पाणीसाठ्यात घट होण्याची शक्यता आहे़ या प्रकल्पातील गाळाचा उपसा केला असता तर प्रकल्पाची साठवण क्षमता वाढली असती, शिवाय शेतकऱ्यांना या गाळाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठीही फायदा झाला असता़ मात्र सरकारी पातळीवरील अनास्थेमुळे येलदरी प्रकल्प गाळयुक्तच राहणार आहे़सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज४परभणी जिल्ह्यात दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ तीन जिल्ह्यांची तहान भागविणारा येलदरी प्रकल्प यावर्षी मृतसाठ्यात गेला असून, प्रकल्पाचा बराचसा भाग उघडा पडला आहे़४मृतसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असून, हा गाळ काढण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ प्रकल्पातील गाळाचा उपसा झाला तर या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढेल़४पर्यायाने जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल़ येलदरी प्रमाणेच जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ तेव्हा पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पातील गाळ उपसण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे़येलदरी धरणातील गाळ काढण्यासाठी यावर्षी प्रशासकीय पातळीवर कोणतेही नियोजन नाही़ त्यामुळे अद्याप गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही़-सुरेश शेजूळ, तहसीलदार, जिंतूरगतवर्षी एनजीओ व मानवलोकच्या माध्यमातून येलदरी धरणातील गाळ काढला होता़ मात्र यावर्षी तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही़ त्यामुळे गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही़-एसक़े़ सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, नांदेड
परभणी : येलदरी धरणातील गाळ काढण्यास प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:31 AM