लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बसस्थानक परिसरातील खड्डे आणि गटार व्यवस्थेसाठी महामंडळ प्रशासन प्रत्येक महिन्यात कामे काढत असले तरी खड्ड्यांचा, धुळीचा आणि पाण्याचा प्रश्न जैसे थे असल्याने कामांच्या माध्यमातून केलेला खर्च पाण्यात जात आहे़परभणी येथील बसस्थानक परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते़ संपूर्ण बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप प्राप्त होते़ याशिवाय स्थानकावर ठिक ठिकाणी खड्डे पडले असून, गिट्टी उखडून गेली आहे़ त्यामुळे ही कामे एकदाच परंतु, दर्जेदार होणे अपेक्षित होते़ विशेष म्हणजे, मागील वर्षी परभणी शहरासाठी अद्यायवत असे बसपोर्ट मंजूर झाले आहे़ त्यामुळे एकाच वेळी खर्च करून प्रवाशांच्या समस्यांचा निपटारा करणे अपेक्षित असताना महामंडळाने दर दोन-तीन महिन्याला छोटी छोटी कामे काढून कंत्राटदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे़ येथील बसस्थानकात जागोजागी खड्डे पडल्याने प्रवाशांबरोबरच बस चालकांना तारेवरची कसरत करावी लगते़या संदर्भात ओरड झाल्यानंतर महामंडळ प्रशासनाने चालू महिन्यामध्ये स़ फैय्याज पाशा या कंत्राटदारामार्फत दुरुस्तीची कामे हाती घेतली़ यामध्ये संपूर्ण बसस्थानक परिसरात मुरूम टाकून लेव्हल करून खड्डे बुजविणे अपेक्षित होते; परंतु, हे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात आले़ स्थानक परिसरात कुठेही मुरूम तर टाकलाच नाही़ परंतु, खड्ड्यामध्ये गिट्टी, मुरूम टाकून जुजबी डागडुजी करण्यात आली़ एक-दोन तास जेसीबी मशीन फिरवून काम झाल्याचे दाखविण्यात आले. विशेष म्हणजे, सोमवारी देखील दुपारी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी ७३ हजार ८०० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातही ७४ लाखांचा खर्च करून तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली होती़ जून २०१८ मध्ये बसस्थानकातील पाणी बाहेर काढून देण्यासाठी ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला़ मात्र आजही स्थानकामधून पाणी बाहेर जात नाही़ त्यामुळे स्थानकातील पाणी साचण्याची समस्या कायम आहे.भिंत अर्धवटतचडिग्गी नाल्याच्या बाजुने असलेली संरक्षक भिंत दोन वर्षापूर्वी पडली होती़ महामंडळाने काही दिवसांपूर्वी ही भिंत बांधून घेतली़ परंतु, हे कामही अर्धवट आहे़ त्यामुळे डिग्गी नाल्याला पूर आल्यानंतर नाल्याचे पाणी स्थानकात शिरण्याचा धोका कायम आहे़रस्त्याचे मजबुतीकरणएसटी महामंडळाच्या बसस्थानकातून आगारामध्ये बस गाड्या नेण्यासाठी असलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम मागील वर्षी जून महिन्यात झाले आहे़ या कामावर ७३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ बसस्थानक ते आगारापर्यंत मुरूम टाकून मजबूत रस्ता तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले़ या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले खरे़ परंतु, अर्धा किमी अंतराच्या मजबुतीकरणासाठी तब्बल ७३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे़ हा रस्ता डांबरीकरण केला असता, कायमस्वरुपी प्रश्न निकाली निघाला असता़बसपोर्टचे भिजत घोंगडे कायमपरभणी शहरासाठी अद्ययावत असे बसपोर्ट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ एक वर्षापासून बसपोर्टचे भिजत घोंगडे कायम असून, या प्रश्नी वेगाने हालचाली होत नसल्याने प्रवाशांना भौतिक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे़ मागील वर्षी जानेवारी महिन्यात शहरात बसपोर्ट मंजूर झाले आहे़ विशेष म्हणजे हे बसपोर्ट उभारण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या़ परंतु, निविदा धारक फिरकले नाहीत़ त्यामुळे २४ आॅक्टोबर २०१८ रोजी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली़ ही निविदा आऱजी़ देशमुख या कंत्राटदारास मंजूर झाल्याची माहिती मिळाली़
परभणी : डागडुजीनंतरही खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:08 AM