लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): अनेक शहरांसह दुधना नदी काठावरील शेकडो गावांची तहान भागविणारा निम्न दुधना प्रकल्प सहा वर्षांनंतर मृतसाठ्यात गेला आहे. परिणामी आगामी काळात पिण्याच्या पाण्याची चिंता वाढणार असून उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.दुधना प्रकल्पातून सेलू शहर तसेच जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा या शहारासह आठ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच परभणी, पूर्णा या शहरांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. गतवर्षी दुधना प्रकल्पातून तीन वेळा नदीपात्राद्वारे पूर्णा शहरापर्यंत पाणी देण्यात आले. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून दोन वेळा पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून पिकांना पाणी देण्यासाठी बेसुमार पाणी उपसा अनेक दिवस सुरू होता. परिणामी प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा वेगाने कमी होत राहिला. दुधना प्रकल्पात २०१० मध्ये पाणी अडविण्यास सुरूवात झाली. त्यावेळी दोन्ही कालव्याची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे; परंतु, डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात आले. उजव्या कालव्याचे अद्यापही काम अपूर्ण असले तरी ज्या ठिकाणापर्यंत काम पूर्ण आहे, त्या ठिकाणापर्यत पाणी सोडले जाते. अल्प पाऊस व पाण्याचा झालेला बेसुमार उपसा यामुळे २०१३ नंतर तब्बल सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात गेला आहे. परिणामी मंठा, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा या शहरांना प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दरम्यान, दुधनेतील पाणीसाठ्यावर शेतकरी अवलंबून असतात. टंचाईकाळात जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी दुधनेतून उपलब्ध केले जाते; परंतु, प्रकल्पच मृतसाठ्यात गेल्याने चिंता वाढल्या आहेत.प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी४सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ ९८ दलघमी पाणी साठा आहे. जो की मृत पाणी साठा आहे. तसेच दुधनेच्या बॅक वॉटरमधून ऊस व उन्हाळी पिकांसाठी दिवस रात्र कृषीपंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. याचा मोठा फटका पाणीसाठ्यावर झाला. त्यामुळे शहरांना पाणी पुरवठा करताना सेलू पालिकेची यावेळी कसरत होणार आहे.
परभणी : सहा वर्षानंतर दुधना प्रकल्प मृत साठ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:26 PM