लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतर आलेला रविवार असे सलग दोन दिवस शासकीय सुट्या आल्याने शहरातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी शुक्रवारी दुपारनंतरच गायब झाले असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.लागून सुट्या आल्या की शासकीय कर्मचारी-अधिकारी गायब होतात, अशा अनेक नागरिकांनी ‘लोकमत’कडे तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने ‘लोकमत’च्या वतीने शुक्रवारी दोन पथकांमार्फत शहरातील शासकीय कार्यालयांचे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. एका पथकाने दुपारी ३.१० वाजता प्रशासकीय इमारतीमधील वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयास भेट दिली असता येथे अधिकारी देशमुख कक्षामध्ये उपस्थित होत्या. तसेच दोन कॅबीनमध्ये कर्मचारी होते. परंतु, इतर कक्षातील कर्मचारी मात्र गायब होते. त्यानंतर पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयास भेट दिली असता ३ ते ४ कर्मचारी वगळता इतर कर्मचारी मात्र उपस्थित नव्हते. ३.१५ वाजता साक्षर भारत कार्यालयास भेट दिली असता केवळ एक महिला कर्मचारी उपस्थित होत्या. तर उपशिक्षणाधिकारी यांच्यासह इतर कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले. या कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास भेट दिली असता येथे कर्मचारी असल्याचे दिसून आले. त्यानंतर ३.२० वाजता सर्व शिक्षा अभियान कार्यालयात भेट दिली असता शिक्षणाधिकारी आशा गरुड या कक्षामध्ये उपस्थित होत्या. तर बैठक सुरु असल्याने इतरही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले. या कार्यालयाच्या बाजुला असलेल्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांचा कक्ष बंद होता. तर येथे केवळ तीन कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर दोन कर्मचारी कार्यालयात जात असताना आढळून आले. ३.२७ वाजता विभागीय वन अधिकारी कार्यालयास भेट दिली असता वन अधिकारी यांचा कक्ष बंद होता. तर दोन कक्षामध्ये मिळून तीन कर्मचारी कामकाज करताना आढळून आले. ३.३४ वाजता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ च्या कार्यकारी अभियंता कार्यालयास भेट दिली असता तीन कक्षामध्ये तीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यालयाच्या बाजुलाच माजलगाव कालवा शाखा क्रमांक १० या कार्यालयात भेट दिली असता तीन कक्षामध्ये तीन कर्मचारी उपस्थित होते. यानंतर ३.४२ वाजता सामाजिक न्याय विभागास भेट दिली असता या कार्यालयातील इतर मागासवर्गीय महामंडळ कार्यालयास कुलूप लावलेले होते. तर वसंतराव नाईक महामंडळ कार्यालयात एक कर्मचारी उपस्थित होता. अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयात दोन कर्मचारी तर चर्मकार महामंडळ कार्यालयात १ कर्मचारी उपस्थित होता. तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळात दोन कर्मचारी उपस्थित होते. सहायक आयुक्त कार्यालयात बहुतांश कर्मचारी काम करताना आढळून आले. ४.१० वाजता अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट दिली असता अन्न प्रशासन विभागात केवळ दोन कर्मचारी कामकाज करीत होते. तर अन्न प्रशासन व औषध प्रशासन आयुक्तांचा कक्ष बंद होता.कक्ष अधिकाºयांचा राहिला नाही धाक‘लोकमत’च्या वतीने शुक्रवारी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत शहरातील विविध शासकीय कार्यालयातील उपस्थित कर्मचाºयांची पाहणी करण्यात आली, तेव्हा बहुतांश कार्यालयातील कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आले. कर्मचाºयांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याने उपस्थित कर्मचाºयांना याबाबत विचारले असता कक्ष अधिकारीच जागेवर उपस्थित नसतात. त्यांचा धाक न राहिला नसल्याने कर्मचारी अधुन-मधून गायब होत असल्याचे पंचायत समितीतील एका कर्मचाºयाने यावेळी सांगितले.‘लोकमत’च्या दुसºया पथकाने ३.१६ वाजता महानगरपालिकेला भेट दिली. तेव्हा पालिकेतील शहर अभियंता, नगररचना कार्यालय, लेखा परिक्षण कार्यालयातील कर्मचारी काम करताना दिसून आले. त्यानंतर ३.२५ वाजता पंचायत समिती कार्यालयास भेट दिली तेव्हा या कार्यालयातील पंचायत विभाग, स्वच्छ भारत मिशन, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागात कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. तर स्वच्छ भारत मिशन विभाग पूर्णत: रिकामा होता. कृषी विभाग व लेखा विभागात कर्मचारी हजर होते. गटविकास अधिकारी यांच्या कक्षाला कुलूप असल्याचे पहावयास मिळाले. ३.४६ वाजता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला भेट दिली. तेव्हा अर्ध्याहून अधिक कर्मचाºयांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गवांदे यांच्या कक्षास कुलूप असल्याचे आढळून आले. कृषी विभागात कृषी विकास अधिकारी कच्छवे यांच्या कक्ष बंद असल्याचे पहावयास मिळाले. तर कर्मचारी काम करताना दिसून आले. सामान्य प्रशासन, लघु पाटबंधारे, वित्त विभाग व पंचायत विभागात कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेलकर यांचा कक्ष बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर ४ वाजेच्या सुमारास सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. त्यानंतर शहरातील मोंढा परिसरातील निरीक्षक वैधमापन शास्त्र विभागाला ४.३५ वाजता भेट दिली असता प्रमुख अधिकारी गायब होते. तर येथील ९ पैकी ५ कर्मचारी काम करताना दिसून आले.
परभणीत दुपारनंतर कार्यालयातून कर्मचारी परागंदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:49 AM