लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करून आंदोलन केले़विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी अनेक मागण्या मांडल्या़ विद्यापीठ प्रशासन युजीसी, आयसीएआर, एमसीएईआर यांनी घालून दिलेल्या शैक्षणिक दंडकांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांचे नुकसान करीत आहे़ अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून दिले जात नाही़ या सर्व पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारीच काही वेळ घोषणाबाजी करून आंदोलन केले़ त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ त्यात २०१६-१७ ला १४ हजार ६०० रुपये एका वर्षाची फिस होती़ ती २०१७-१८ मध्ये ३९ हजार ५०० रुपये एवढी वाढविली आहे़ इतर राज्यात मात्र ही फिस कमी आहे़ तेव्हा फिस कमी करावी, २२ जानेवारीचा शासन निर्णय रद्द करावा, कृषी पदव्युत्तर पदवीला पूर्णत: व्यावसायिक दर्जा द्यावा, कृषी पदवीधर पदवीच्या बंद झालेल्या शिष्यवृत्या पूर्ववत सुरू कराव्यात, पदवी शिक्षण क्षेत्रात परीक्षेचा निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्याची जबाबदारी पार पाडावी, दुसऱ्या व चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या नियमित शैक्षणिक सहली काढाव्यात, अशा २२ मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत़ या मागण्या मान्य न झाल्यास ५ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़
परभणी : कृषी विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:51 AM