लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील कोल्हावाडी येथील लघू पाटबंधारे विभागाचा आंबेगाव तलाव मार्च महिन्यातच कोरडाठाक पडला आहे. तलाव आटल्याने या भागात जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने भटकंती करावी लागत आहे. उन्हाळी हंगामातील बागायती पिके सलाईनवर गेली आहेत.मानवत तालुक्यात यावर्षी अत्यल्प पर्जजन्यमान झाले. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. राज्य शासनाने मानवत तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. ग्रामीण भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने बागायती पिकेही धोक्यात आली आहेत.तालुक्यातील कोल्हावाडी येथे लघू पाटबंधारे विभागांतर्गत आंबेगाव लघू तलाव आहे. या तलावावर तालुक्यातील कोल्हावाडी सोबतच कोल्हा, सोमठाणा, आटोळा या भागातील सिंचन शेती अवलंबून आहे. पाऊस कमी पडल्याने हा तलाव यावर्षी ३० टक्के भरला गेला होता. त्यामुळे सुरुवातीपासून पाणीटंचाई निर्माण होईल, असे चित्र होते. मार्च महिन्यापासून तलावातील पाणी मृत साठ्यात आले होते. एप्रिल महिन्यात तर हा तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आताच अशी परिस्थिती आहे. तर आणखी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने परिस्थिती खूपच गंभीर होणार असल्याचे दिसून येत आहे.पशूधनाची विक्री वाढलीआंबेगाव येथील तलाव आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालवधी आहे. पाण्यासाठीही जनावरांना भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर मानवत तालुक्यातील कोल्हावाडी, आंबेगाव, सोमठाणा, आटोळा या शिवारात चाºयाची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. चारा आणि मूबलक पाणी मिळत नसल्याने पशूपालकांचा कल पशूधन विक्रीकडे असल्याचे दिसून येत आहे.परतीच्या पावसानेही फिरविली पाठदरवर्षी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी परिसरातील आंबेगाव तलाव परतीच्या पावसाने १०० टक्के भरतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने आंबेगाव तलावात मूबलक पाणीसाठी झाला नाही. परिणामी मार्च महिन्यातच हा तलाव कोरडाठाक पडला असून, परिसरातील टंचाई वाढली आहे.
परभणी : कोल्हावाडी येथील आंबेगाव तलाव पडला कोरडाठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 11:14 PM