लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील जलतरणिकेच्या संरक्षक भिंतीवर ठेवलेल्या बॅग विषयी संशय वाढल्याने पोलिसांनी श्वानाच्या सहाय्याने शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एक चादर आढळली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील जलतरणिका संकुलाच्या एका संरक्षक भिंतीवर झाडाआड एक बॅग लपवून ठेवल्याची बाब वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पडळकर यांच्या निदर्शनास आली. संरक्षक भिंत परिसर हा तसा ओसाड असून बॅग ठेवण्याची ती जागा नसल्याने त्यांना या बॅगविषयी संशय वाढला. काही अनुचित प्रकार असू शकतो, अशी शंकाही निर्माण झाल्याने पडळकर यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली.ही माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, पोलीस नियंत्रण कक्ष आणि घातपात विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक यांच्यासह संतोष मोहाळे, प्रवीण घोंगडे, शेख शकील, प्रेमदास राठोड, गुंडाळे आदी घटनास्थळी दाखल झाले. बॅगची प्रथमदर्शनी पाहणी केली असता ही बॅग संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने प्रथम या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर घातपात विरोधी पथकातील तज्ज्ञ कर्मचाऱ्यांनी आधुनिक साहित्याच्या सहाय्याने आणि श्वान ओरियन याच्या मदतीने या बॅगची तपासणी केली. तपासणीअंती या बॅगमध्ये केवळ एक चादर आढळली. दरम्यान परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
परभणी : अन् बेवारस बॅगमध्ये आढळली चादर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:21 AM