लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): जनावरांना लाळ्या, खुरकूत रोगाच्या लसीकरणानंतर दोनच महिन्यात जनावरांना या रोगाची लागण झाल्याचा प्रकार दिसून येत आहे. एकट्या पाथरगव्हाण बु. येथील जवळपास शंभरहून अधिक संकरित गायी आणि जनावरांना या रोगाची लागण झाल्याने येथील पशुपालक अडचणीत सापडले आहेत.राज्य शासन दरवर्षी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील जनावरांना होणाऱ्या लाळ्या, खुरकूत रोगावरील नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविते. गतवर्षी जनावरांच्या लसीकरणाचा विषय राज्यस्तरावर चर्चिला गेला होता. वेळेच्या आत लस उपलब्ध झाली नसल्याने गतवर्षी मोठ्या प्रमाणावर जनावरांवर लाळ्या, खुरकूत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने अनेक जनावरे या रोगामुळे मृत्यूमुखी पडली होती. या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यात यावर्षी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सप्टेंबर महिन्यामध्ये लाळ्या-खुरकूत या रोगावर लसीकरण मोहीम राबविली होती; परंतु, लसीकरणाच्या दोनच महिन्यानंतर तालुक्यातील जनावरांना लाळ्या-खुरकूत या साथीच्या रोगाची लागण झाल्याचा प्रकार पाथरगव्हाण येथे दिसून येत आहे. या गावात सप्टेंबर महिन्यात २५० पेक्षा अधिक जनावरांना लसीकरण करण्यात आले होते. लसीकरण केल्यानंतर वर्षभरात रोगाची लागण होत नसते. मात्र लसीकरण करुन दोनच महिने उलटले. त्यातच जनावरांना या रोगाची लागण झाल्याने लसीकरणावर पशुपालकांना शंका वाटत आहे.दूध उत्पादक अडचणीत४पाथरगव्हाण बु. येथे शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. या गावातून दररोज १२०० लिटर दूध शासकीय डेअरीला जाते. या गावात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या जनावरांना लाळ्या-खुरकूत रोगाची लागण झाल्याने पशुपालक चिंतेत आहेत.शेतकºयांनी बँकेचे कर्ज काढून संकरित जनावरे खरेदी करुन दुग्ध व्यवसाय सुरु केला. मात्र लसीकरण करुनही या गायींना लाळ्या-खुरकूत या साथ रोगाची लागण झाली आहे.-पप्पू घाडगे, पशुपालक
परभणी : लाळ्या, खुरकूत रोगाची जनावरांना झाली लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:56 AM